सुहास जोशी

वेबसीरिजच्या लोकप्रियतेनंतर काही ठोकताळेदेखील बनू लागले, पण त्याच वेळी त्या चाकोरीच्या बाहेर जात काहीतरी वेगळे मांडू पाहणारेही यात उतरले. त्यातून कायमच काहीतरी भव्यदिव्य किंवा प्रखर वास्तववादी वगैरे मांडणी किंवा क्रांतिकारी रचना, विचार असेलच असे नाही. पण दृक्श्राव्य मांडणीतून प्रेक्षकांना एखादी हलकीफुलकी कथा सांगण्याचा प्रयत्न असू शकतो. असाच प्रयत्न नेटफ्लिक्सवरील ‘अपस्टार्ट्स’ या वेब चित्रपटाचा आहे. अत्यंत साधे-सरळ, कधी कधी एकरेषीय म्हणावे असे कथानक असतानाही ते पाहण्यासारखे आहे हेच त्याचे महत्त्वाचे वैशिष्टय़.

आजच्या काळातील तीन मित्रांची ही कथा आहे. कपिल, यश आणि विनय हे तिघेही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले. एकत्र शिकलेले आणि नोकरीसाठी बंगळूरुमध्ये एकत्र राहणारे.  काहीतरी नवीन करावे, स्टार्टअप सुरू करावे असे त्यांच्या डोक्यात सतत घोळत असते. पण नेमके काय करायचे हे काही केल्या हाताला लागत नसते. अशा वेळी कपिल स्वयंसेवी संस्थेबरोबर काम करताना एका खेडय़ात औषधोपचार वेळेवर न मिळाल्यामुळे झालेला मृत्यू पाहतो. इंटरनेट आहे, स्मार्ट फोन आहे, पण औषधसेवा वेळेवर नाही अशी परिस्थिती. हाती असलेल्या स्मार्ट फोनचा वापर करून औषधे खेडोपाडी पोहोचवण्यासाठी एखादे अ‍ॅप विकसित करायची कल्पना त्याला सुचते. त्यानुसार कॅरी करो हे अ‍ॅप तयारदेखील होते. मात्र भांडवल कमतरतेच्या खडकावर  हे स्टार्टअप फुटणार की काय?, अशी स्थिती येते. पण अचानक भांडवलदेखील उपलब्ध होते. मात्र त्यानंतरचा प्रवास एकदमच वेगळा होतो. तिघेही जिवलग मित्र, पण त्यांच्या दिशा बदलतात. व्यवसायाची गिमिक्स करताना कपिल हा यश आणि विनय या दोघांपासून वेगळा होतो. पुढे त्या व्यवसायात अनेक गोष्टी घडतात.

स्टार्टअप हा आजच्या डॉट कॉमनंतरचा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यवसायाचा नवा अध्याय. स्टार्टअप हाच विषय घेऊन चित्रपट किंवा सीरिज आपल्याकडे फारशा झाल्या नाहीत. त्याचा संदर्भ एखाद्या कथानकात वगैरे असायचा, पण या चित्रपटात कथानकाचा गाभा हाच मुळी स्टार्टअपचे जग आणि त्याभोवतालचे मानवी भावभावनांचे कंगोरे अशा स्वरूपाचा आहे. स्टार्टअप सुरू करणे ते त्याचे यश या भोवती इतर कथानक फिरते. त्यामुळे इतर जोडकथानके घुसविण्याची कसलीही संधी यामध्ये नाही. स्टार्टअपला निधी उभारताना येणाऱ्या अडचणी, निधी मिळाल्यावर त्याचे मूल्य वाढवणे, मात्र फायदा मिळताना येणारे अडथळे यावर सारा भर आहे. आणि त्या माध्यमातून तीन मित्रांच्या आयुष्यात होणारे बदल टिपण्याचा प्रयत्न यातून दिसून येतो. त्यातील काही भाग सिनेमाकर्त्यांच्या खऱ्या आयुष्यातील आहे हा आणखीन एक आधार.

अगदीच साधीसुधी वाटावी अशी ही कथा आहे. पण त्यात जीव असल्यामुळे प्रेक्षकांना उत्सूकता निर्माण होण्याइतपत ताकद आहे. विशेषत: हा विषय अगदी ताजा असल्यामुळे तो कोठे ना कोठे तरी थेट जोडता येतो. त्यामुळे त्याचं हलकंफुलकं असणं फारसं न टोचता पुढे काय याची उत्सुकता टिकू न राहते. तुलनेने शेवट हा अगदीच साचेबद्ध सुखांताच्या पद्धतीने झाला आहे ही त्रुटी.

फारसे प्रसिद्धीच्या झोतात नसलेले कलाकार आणि मर्यादित चित्रीकरण स्थळे असे असतानाही हा चित्रपट पाहिला जातो. त्याचे कारण हे त्याच्या मांडणीत आहे. त्यात एक सहजता आहे. प्रतिकं, उपमा वगैरेचा वापर न करता एक साधीसोपी कथा सरळपणे समोर ठेवली जाते. यात काही ठिकाणी अतिशोयक्ती जाणवू शकते, पण काल्पनिक कथानकाच्या मांडणीत ते सहज खपून जाते. पण त्याच काल्पनिकतेबरोबर या विषयाशी निगडित वास्तववादी घटनांची दखलदेखील सिनेमाकर्त्यांंनी घेतली आहे हे महत्त्वाचे.

गेल्या एक-दोन वर्षांत वेबमाध्यमावरून मनोरंजनाचे अनेक प्रकार लोकप्रिय होत असतानाच त्याचे साचे ठरू लागले. लैंगिक आणि गुन्हेगारी हे दोन घटक नसतील तर लोकप्रिय होता येत नाही, अशी समजूत तयार झाली आहे. वेबसीरिजमध्ये त्याचा खूपच प्रभाव राहिला, पण त्याच वेळी ठरवून केलेल्या वेबफिल्ममध्ये (वेबवरच प्रदर्शित होणारे चित्रपट) तुलनेने चांगले प्रयोग झाले. तेदेखील प्रामुख्याने नेटफ्लिक्सवर. ‘लव्ह पर स्क्वेअर फीट’, ‘सोनी’ यांसारख्या वेब फिल्मनी ते दाखवून दिले. तेच आता ‘अपस्टार्ट’ या वेब चित्रपटाने पुढे नेले आहे. वेबसाठीचा आशय स्वतंत्रपणेच विकसित होणे गरजेचे असल्याचे यातून दिसून येते. त्यामुळेच अशा चित्रपटांचे स्वागत महत्त्वाचे ठरते. काही विषयच आज मुख्य धारेतील चित्रपटांमधून कमी होत असताना त्यांच्यासाठी वेबसारखे प्लॅटफॉर्म उपलब्ध होत असून ते सिनेमाकर्ते आणि प्रेक्षक या दोहोंसाठी फायदेशीर ठरणारे आहेत.

अपस्टार्ट

ऑनलाइन अ‍ॅप – नेटफ्लिक्स