‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट गेल्याच महिन्यात प्रदर्शित झाला. हा चित्रपट तर सुपरहिट झालाच पण यातले अनेक डायलॉग्जही सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चिले गेले. यातला ‘हाउज द जोश’ हा डायलॉग तर तरुणांमध्ये तुफान गाजला. अंगात नवीन जोश संचारणारं हे वाक्य चित्रपटात आलं कुठून याची रंजक गोष्ट चित्रपटाचे दिग्दर्शक, लेखक आदित्य धार यांनी सांगितली.

या वाक्याशी त्यांच्या बालपणीच्या अनेक आठवणी जोडल्या आहेत. ‘माझ्या अनेक मित्रांचे कुटुंबीय सैन्यात होते. त्यामुळे मित्रांसोबत मी अनेकदा आर्मी क्लबमध्ये जायचो. ख्रिस्मस किंवा नववर्षांच्या संध्याकाळी तिथे काही निवृत्त ब्रिगेडियर यायचे. त्यातले एक ब्रिगेडियर आम्हा सर्व लहान मुलांना रांगेत उभं करायचे आणि ‘हाउज द जोश’ हा प्रश्न विचारायचे. जो मुलगा सर्वात मोठ्या आवाजात ‘हाय सर’ म्हणेल त्याला चॉकलेट्स मिळायचे. मी नेहमीच चढ्या आवाजात ‘हाय सर’ म्हणायचो म्हणून मला जास्त चॉकलेट्स मिळायची. काही आर्मी ऑफिसरच्या तोंडी मी हे वाक्य अनेकदा ऐकलंय म्हणूनच मी ते चित्रपटात वापरण्याचं ठरवलं. ते इतकं प्रसिद्ध होईल याची मी कल्पनाही केली नव्हती’ असं आदित्य धार म्हणाले.

जम्मू- काश्मीरमधल्या उरी येथील मुख्यालयावर पहाटेच्या सुमारास चार दहशतवाद्यांनी हल्ला केला. या भ्याड हल्ल्यात १९ भारतीय जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर गप्प न बसता भारतानं या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचा कसा सूड घेतला याची शौर्यगाथा ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’मधून दाखवण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात प्रदर्शित झालेला हा चित्रपट २०१९ मधला सुपरहिट चित्रपट ठरला होता.