14 November 2019

News Flash

उर्मिला मराठीत!

‘लकडी की काठी काठी पे घोडा’ म्हणत बाल कलाकार म्हणून सुरुवात केलेल्या उर्मिला मातोंडकरने पुढे ‘रंगीला’मध्ये ‘तनहा तनहा’ म्हणत प्रेक्षकांना घायाळ केले.

| March 14, 2014 02:07 am

‘लकडी की काठी काठी पे घोडा’ म्हणत बाल कलाकार म्हणून सुरुवात केलेल्या उर्मिला मातोंडकरने पुढे ‘रंगीला’मध्ये ‘तनहा तनहा’ म्हणत प्रेक्षकांना घायाळ केले. मात्र अगदी पोरवयापासून हिंदीतच रमलेली उर्मिला आता मराठीतही झळकणार आहे. ‘आजोबा’ या चित्रपटाद्वारे ती मराठीत पदार्पण करत आहे. ‘शाळा’चे दिग्दर्शक सुजय डहाके आजोबाचेही दिग्दर्शन केले आहे. २००९ मध्ये पुण्याजवळील जुन्नर येथे घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. एका कुत्र्याचा पाठलाग करताना विहिरीत पडलेल्या बिबटय़ाला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढले. या बिबटय़ाला माळशेज घाटात सोडण्यात आले होते. सोडून देण्यात आलेला बिबटय़ा काय करतो, कुठे जातो, हे कळावे म्हणून त्याच्या अंगावर एक चिप बसविण्यात आली आणि ‘जीपीएस’ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्याच्या प्रवासाचा मागोवा घेण्याचे ठरविण्यात आले. माळशेज घाट ते मुंबईचे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे १२० किलोमीटरचे अंतर या बिबटय़ाने २९ दिवसांत पार केले आणि तो मुंबईत आला.
वन्यप्राणी संशोधक विद्या अत्रे या प्रत्यक्षातील या घटनेच्या खऱ्या साक्षीदार. विद्या अत्रे यांचीच भूमिका उर्मिला करत आहे. माणसाने स्वत:च्या फायद्यासाठी केलेली बेसुमार जंगलतोड, त्यामुळे जंगलात राहणाऱ्या वन्य प्राण्यांचे धोक्यात आलेले जीवन, निवारा शोधत त्यांनी गाठलेले माणसांचे निवासस्थान आणि आपले स्वत:चे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी जंगली प्राण्यांचा माणसाबरोबर सुरू असलेला संघर्ष या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. पाश्चात्य सिनेमॅटोग्राफर दिएगो रॉमेरो यांनी चित्रपटाचे छायांकन केले आहे. हा चित्रपट १४ मे रोजी प्रदर्शित होत आहे. चित्रपटात उर्मिलासह यशपाल शर्मा, दिलीप प्रभावळकर, ऋषिकेश जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

First Published on March 14, 2014 2:07 am

Web Title: urmila matondkar in marathi movie