‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने अभिनेत्री अदिती द्रविडने आपल्या चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. प्रेम रंगात रंगलेली ‘राधा’ हे मॅशअप नुकतेच प्रदर्शित झालं आहे. ‘मोहे रंग दो लाल’ आणि ‘मी राधिका’ या दोन गाण्यांच्या मॅशअपमध्ये अदितीने सुंदररित्या नृत्य करत राधा आणि श्रीकृष्णातील प्रेमभाव व्यक्त केला आहे.

उत्कट प्रेमाचं निरागस रूप म्हणजे राधा. प्रेमात अखंड बुडालेल्या राधाला रंगवताना भरतनाट्यम नृत्यांगना असल्याचा फायदा मला झाला. भारतीय शास्त्रीय नृत्यात राधा-कृष्णाचा प्रणय, प्रेमातला दूरावा, ताटातूट या संदर्भातल्या अनेक कथा आहेत. मी शास्त्रीय नृत्यांगना असल्याने मला या कथा, त्यातले भाव आणि पदन्यास माहित होते. त्यामुळेच राधा गाण्यात मी ते भाव उत्तम पध्दतीने साकारू शकले’, असं अदिती राधा म्हणाली.

पुढे तिने असंही सांगितलं, व्हॅलेंटाइन डेला आपण प्रेमाच्या दिव्यत्वाविषयी बोलतो. प्रेमातली हा दैवी भाव या गाण्याच्या चित्रीकरणामुळे अनुभवता आला. स्वत:ला विसरून दूस-यावर समर्पित भावनेने प्रेम करण्याची कल्पना मला नेहमीच आवडते. मी त्या ‘ओल्ड स्कुल लव्ह स्टोरी’ला मानते. आणि या व्हिडिओच्या शूटिंगच्या दरम्यान मला त्या समर्पित प्रेमातली उत्कटता अतरंगी स्पर्शून गेली’.

टायनी टॉकिज प्रस्तुत हे गाणं पियुष कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलं आहे. तर सुवर्णा राठोड यांचा सुमधूर आवाज या गीतांना लाभला आहे.