स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. या मालिकेच्या ३१ डिसेंबरच्या भागात प्रेक्षकांना अनोखं सेलिब्रेशन पाहायला मिळणार आहे. संपूर्ण शिर्के पाटील कुटुंब नवीन वर्षांचं स्वागत अगदी जल्लोषात करणार आहेत. विशेष म्हणजे अभिनेत्री वर्षा उसगांवकर त्यांच्या गंमत जंमत या सुपरहिट सिनेमातील ‘उधळीत येरे गुलाल सजणा’ या सुपरहिट गाण्यावर परफॉर्म करणार आहेत. मालिकेतील त्यांची धाकटी सून गौरी म्हणजेच गिरीजा प्रभूने या खास नृत्यासाठी कोरिओग्राफी केली आहे.
या परफॉर्मन्सविषयी सांगताना वर्षाताई म्हणाल्या, “गंमत जंमत सिनेमात मी उधळीत येरे गुलाल सजणा या गाण्यावर परफॉर्म केलं होतं. त्यानंतर जवळपास ३३ वर्षांनंतर पुन्हा एकदा त्या गाण्यावर परफॉर्म करण्याचा योग जुळून आला आहे याचा आनंद होतोय. इतक्या वर्षात मी कधीच या गाण्यावर परफॉर्म केलं नाही. त्याकाळच्या बऱ्याच नायिकांनी या गाण्यावर परफॉर्म केलं होतं. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या निमित्ताने माझी ही इच्छा पूर्ण होतेय. ३१ डिसेंबरच्या विशेष भागात माझा हा खास परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे. मालिकेतली माझी सून गौरी म्हणजेच गिरीजा प्रभूने हे गाणं कोरिओग्राफ केलं आहे.”
सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका रात्री ९.३० वाजता स्टार प्रवाहवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 27, 2020 9:00 am