राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री वीणा जगताप सध्या बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वामध्ये सहभागी झाली आहे. घरात प्रवेश केल्यापासून वीणा या ना त्या कारणामुळे चर्चेत येत आहे. विद्याधर जोशी, शिवनी सुर्वे आणि वैशाली म्हाडे यांच्यासोबत झालेल्या तिच्या वादाबरोबरच रुपाली भोसले, किशोर शहाणे, पराग कान्हेरे आणि शिव ठाकरे यांसोबतच्या तिच्या मैत्रीचे किस्से देखील गाजले. तिच्या या स्वभावामुळे आणि टास्क खेळण्याच्या पद्धतीमुळे सध्या ती प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे.

चोर-पोलीस टास्कदरम्यान शिवानी आणि विणामध्ये वाजलेलं ‘लाथ’ प्रकरण जरा अधिकच गाजलं. इतकेच नव्हे तर त्यावरून बिग बॉसच्या घरात खटलादेखील चालला. मात्र, आपली बाजू सत्य असूनही घरच्या सदस्यांच्या पक्षपातीपणामुळे वीणाला अपराधी घोषित करण्यात आले. शिवाय विकेंडच्या डावात घरच्या सदस्यांचे बहुमत न मिळाल्यामुळे वीणाच्या डोक्यावर बर्फाचे थंड पाणी ओतले गेले. अशाप्रकारे प्रत्येक शिक्षेला खिलाडूवृत्तीने सामोरे गेलेल्या वीणाने तसूभरदेखील कॅमेऱ्यासमोर येऊन आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळेच तिची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

वीणाच्या याच संयमी वृत्तीवर खुश होऊन, तिच्या चाहत्यांनी तिला अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले आहे. वीणासाठी बिग बॉसच्या घरातला हा दुसरा आठवडा ‘कभी ख़ुशी कभी गम’ असा जरी ठरला असला, तरी घराबाहेर ती सुपरहिट ठरली आहे. शिवानी आणि विणाच्या भांडणांला दोघे समान कारणीभूत असूनही शिक्षा मात्र वीणाला मिळणे हे पूर्णपणे पक्षपातीपणाचे लक्षण असल्याचे तिच्या चाहत्यांकडून सांगितले जात आहे. शिवाय, अडगळीच्या खोलीत जाण्याची शिक्षा मान्य करूनदेखील, त्यानंतरच्या खटल्यात आणि ‘विकेंड चा डाव’ मध्ये वीणावरच दोषी असल्याचा शिक्का बसावा, हे कितपत योग्य आहे? असादेखील प्रश्न वीणाचे हितचिंतक विचारू लागले आहेत.

वीणाने आतापर्यंत आपला संयम कायम राखत, पदोपदी आपली प्रामाणिकता आपल्या वागण्यांतून स्पष्ट केली आहे. त्यामुळे ती आपल्यासाठी कट्टर प्रतिस्पर्धी होऊ शकते या भीतीने घरातील सदस्य तिच्या विरोधात पाऊले उचलत आहे. याचीच प्रचिती शनिवार आणि रवीवारच्या भागात दिसून आली. असे असले तरी, घराबाहेरील सुज्ञ प्रेक्षकांनी सोशल नेटवर्किंग साईटद्वारे भरभरून मत देत तिला सेफ केले. थोडक्यात काय तर, घरच्यांचे सर्वाधिक मते जरी वीणाला मिळाले नसले तरी प्रेक्षकांच्या बहुमताने तिला वाचवले !