News Flash

फाईट मास्टर वीरू देवगण यांना अनोखी सलामी

हिंदी चित्रपटसृष्टीत फाईट मास्टर म्हटले की आजही वीरू देवगण हे नाव पहिल्यांदा घेतले जाते.

हिंदी चित्रपटसृष्टीत फाईट मास्टर वीरू देवगण

हिंदी चित्रपटसृष्टीत फाईट मास्टर म्हटले की आजही वीरू देवगण हे नाव पहिल्यांदा घेतले जाते. गेली अनेक वर्ष बॉलीवुडमध्ये फाईट मास्टर म्हणून लौकिक टिक वून असलेल्या वीरू देवगण यांना नुकत्याच झालेल्या ‘झी सिने अ‍ॅवॉर्ड’ सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. वीरू देवगण यांना सलामी देण्यासाठी त्यांचा शिष्य दिग्दर्शक रोहित शेट्टीने एक लाईव्ह स्टंट अभिनेता विद्युत जामवालच्या मदतीने रंगमंचावर जिवंत केला.
बॉलीवुडमध्ये पडद्यामागच्या कलाकारांना फार कमी वेळा सन्मानाचे क्षण अनुभवायला मिळतात. गेली अनेक दशके वेगवेगळ्या कलाकारांनाअ‍ॅक्शनचे धडे देणाऱ्या वीरू देवगण यांना या सोहळ्यासाठी जीवनगौरव पुरस्कार देण्याचे निश्चित झाले. तेव्हा आपल्या या गुरूला गुरूदक्षिणा म्हणून एक अनोखा अ‍ॅक्शन कार्यक्रम करण्याची तयारी दिग्दर्शक रोहित शेट्टीने केली. या अ‍ॅक्शन स्टंटसाठी रोहितने एवढय़ा बॉलीवुड कलाकारांमधून माझी निवड केली याचा आनंद शब्दांत सांगू शकत नाही, अशी प्रतिक्रिया विद्युत जामवाल याने ‘वृत्तांत’शी बोलताना दिली. सध्या अ‍ॅक्शन स्टंट करणाऱ्या बॉलीवुड कलाकारांमध्ये विद्युत जामवालचे नाव आदराने घेतले जाते. कारण, तो बॉडी डबलची मदतही घेत नाही आणि केबल्स वगैरे न वापरता तो स्वत:चे स्टंट्स करतो. ‘कमांडो २’च्या चित्रिकरणात व्यग्र असलेल्या विद्युतने रोहितबरोबर केलेला हा लाईव्ह स्टंट आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय गोष्ट असल्याचे सांगितले. वीरू देवगण आणि रोहित शेट्टी ही दोन्ही नावे आपल्यासाठी गुरूस्थानी असल्याने या दोघांसाठी या अ‍ॅक्टमधून काम करता आले, याबद्दल त्याने आनंद व्यक्त केला.
दिग्दर्शक म्हणून रोहित शेट्टी खूप मोठे नाव आहे. त्याच्याबरोबर कधी ना कधी काम करण्याची इच्छा होती. ती या अ‍ॅक्टच्या निमित्ताने पूर्ण झाली. एवढा मोठा दिग्दर्शक असूनही तो समोरच्याच्या मताला, विचारांना तेवढेच महत्व देतो. त्याला माणसांची चांगली परख आहे. त्यामुळे हा अ‍ॅक्ट करत असताना त्याच्याकडून शिकायलाही मिळाले आणि आजवरच्या आपल्या अनुभवाचा प्रत्यक्ष वापर करण्याची संधीही मिळाली, असे विद्युत म्हणतो. हा लाईव्ह अ‍ॅक्ट करत असताना समोर बसलेल्या सेलिब्रिटींची सुरक्षाही महत्वाची होती. त्या व्यासपीठावर वेगाने येणारी गाडी हवेत उडवली गेली.
एवढे मोठे स्टंट्स त्या वेळेत, त्या पध्दतीत पूर्ण करण्याचे आव्हान आमच्यावर होते. चित्रपटांमधून अ‍ॅक्शन करण्याचा मला अनुभव आहे. मात्र या अ‍ॅक्टमध्ये गाडी माझ्या अंगावरून जाणार होती. तिचा पुसटसाही स्पर्श मला झाला असता तर मी पडलो असतो, अ‍ॅक्ट फसला असता आणि एकच हल्लकल्लोळ झाला असता त्यामुळे त्या क्षणाला पोटात गोळा आला होता, हृदयाची धडधड वाढली होती, अशी मनमोकळी कबूलीही विद्युतने दिली. ‘कमांडो’ हिट झाल्यामुळे ‘कमांडो २’ मध्ये आधीपेक्षाही वेगळी स्टंट दृश्ये पहायला मिळतील, अशी खात्रीही त्याने दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2016 1:20 am

Web Title: veeru devgan get lifetime award in zee cine awards
Next Stories
1 फ्लॅशबॅक : गोष्ट एका वादळाची
2 ज्येष्ठ विनोदी अभिनेते आसरानी आता मराठीत
3 संजय दत्तच्या सुरक्षेसाठी सल्लूमियाँने पाठवले अंगरक्षक
Just Now!
X