आपलं आयुष्य साडेपाच इंचाच्या मोबाईल स्क्रीनपुरताच मर्यादित राहिलं आहे. सोशल मीडिया आणि मोबाईल फोन यापलिकडे आपल्यासाठी दुसरं जगच अस्तित्त्वात नाही. मात्र विजय चव्हाण अर्थात विजू मामा हे मात्र कधीही या मोहात पडले नाही. ‘मला फोन वापरायला अजिबात आवडत नाही’, काही महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमात ते म्हणाले होते.

‘मोरूची मावशी’, ‘श्रीमंत दामोदरपंत’, ‘तू तू मी मी’, ‘अशी ही फसवा फसवी’ यांसारख्या नाटकांमधून रसिकप्रेक्षकांना खळखळून हसवणारे विजय चव्हाण यांना जीवनातील आनंदाचा खरा अर्थ समजला होता. मोबाईल फोन सोशल मीडियाच्या मायाजालेत अडकण्यापेक्षा त्यापासून लांब राहण्यात ते धन्यता मानत. आजच्या काळातही विजय चव्हाण मोबाईल वापरत नव्हते ही आश्चर्याची बाब होती.

विजय चव्हाण आणि छबिलदासचा वडा, हा किस्सा तुम्हाला माहितीये का?

त्यांच्याशी संपर्क करायचा असेल तर त्यांचा मुलगा वरद याच्याशी अनेकजण संपर्क साधायचे. विजूमामांशी काही बोलायचं असेल तर तो निरोप वरदकडून मग त्यांच्यापर्यंत पोहोचायचा आणि मगच ते संपर्क साधायचे. मोबाईल काळाची गरज होती मात्र ही गरज कधीही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग त्यांनी होऊ दिली नाही. मला मोबाईल वगैरे वापरायला अजिबात आवडत नाही, महत्त्वाचं काम असेल तर वरद आहेच असं ते एका कार्यक्रमात म्हणाले होते.

VIDEO : ‘टांग टिंग टिंगाक्…’ म्हणणारी ‘मोरुची मावशी’ पाहाच

बाबांना मोबाईल वापरायला कधीच आवडलं नाही त्यामुळे ते त्यापासून लांबच राहायचे असं त्यांचा मुलगा वरद ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना म्हणाला. फोनवरून संपर्क साधण्यापेक्षा आपल्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणं त्यांना अधिक आवडायचं.