मुंबईतील ‘सवाई गंधर्व महोत्सव’ अशी मान्यता लाभलेल्या यंदाच्या ‘हृदयेश फेस्टिव्हल’मध्ये आजवरच्या लौकिकानुसार दिग्गजांचा कलाविष्कार रसिकांना अनुभवता येणार आहे. हा महोत्सव ‘लोकसत्ता’तर्फे प्रस्तुत होत आहे. ‘हृदयेश फेस्टिव्हल’ हे चोविसावे वर्ष असून यंदा १८ ते २० जानेवारी या कालावधीत विलेपाल्रे पूर्व येथील साठय़े महाविद्यालयाच्या प्रांगणात एकूण चार सत्रांत हा महोत्सव रंगणार आहे.
पहिल्या सत्राची सुरुवात १८ जानेवारी रोजी सायंकाळी पं. सतीश व्यास यांच्या संतुरवादनाने होत असून त्यानंतर अश्विनी भिडे देशपांडे यांचे गायन व सत्राची अखेर पं. बुद्धादित्य मुखर्जी यांच्या सतारवादनाने होत आहे. १९ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता उस्ताद राशिद खान यांचे सकाळचे राग ऐकायचा दुर्मीळ योग रसिकांना मिळेल. त्या दिवशी संध्याकाळच्या सत्राची सुरुवात अयान अली खान सरोदवादनाने करतील. आरती अंकलीकर टिकेकर यांचे गायन आणि ज्येष्ठ  कलाकार पं. बिरजू महाराज त्यांचे शिष्य व चिरंजीव दीपक महाराज यांच्यासमवेतच्या नृत्याविष्काराने रविवारच्या सत्राची अखेर होईल. पंडित बिरजू महाराजांचे हे पंचाहत्तरीचे वर्ष असल्याने त्यांचा विशेष सन्मान याप्रसंगी करण्यात येणार आहे.
‘हृदयेश आर्ट्स’ या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचे प्रमुख वैशिष्टय़ म्हणजे पं. कुमार बोस आणि पं. अिनदो चटर्जी या ज्येष्ठ तबलावादकांची जुगलबंदी.
गेल्या कित्येक वर्षांत मुंबईत या दोन दिग्गज तबलावादकांची जुगलबंदी रसिकांना अनुभवायला मिळालेली नाही. त्यामुळे यानिमित्त कानसेनांसाठी खास पर्वणी चालून आली आहे. पुढील वर्षीच्या रौप्य महोत्सवात गायन आणि वादनातील सध्याचे सर्वोच्च नामांकित कलाकार सहभागी होणार आहेत, अशी माहिती ‘हृदयेश आर्ट्स’चे प्रमुख अविनाश प्रभावळकर यांनी दिली.
या महोत्सवात दिला जाणारा ‘हृदयेश संगीत सेवाव्रती पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ संवादिनीवादक पं. तुळशीदास बोरकर यांना पं. जसराज यांच्या हस्ते सोमवार, २० जानेवारी रोजी दिला जाईल. एक लाख रुपये रोख आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार आतापर्यंत पं. यशवंतबुवा जोशी, बबनराव हळदणकर आणि धोंडुताई कुलकर्णी यांना देण्यात आला आहे.
या महोत्सवाच्या प्रवेशिका दीनानाथ नाटय़गृह, विलेपाल्रे आणि महाराष्ट्र वॉच अ‍ॅण्ड ग्रामोफोन कंपनी, दादर येथे उपलब्ध आहेत.