काही व्यक्तिमत्त्व म्हणजे अजब रसायन असते. स्वत:ची एक विशिष्ट ओळख त्या व्यक्तीने निर्माण केलेली असतेच; पण त्या पलीकडे जाऊन अन्य क्षेत्रातही त्याने आपले स्थान तयार केलेले असते. आजच्या ‘पुनर्भेट’मधील ती व्यक्ती अभिनेता आहेच, पण त्याच बरोबर तिने नाटककार, दिग्दर्शक, प्राध्यापक, लेखक, अनुवादक, नाटय़निर्माता अशा विविध भूमिकाही लीलया पार पाडल्या आहेत. हे बहुआयामी आणि चतुरस्र व्यक्तिमत्त्व आहे ज्येष्ठ अभिनेते मधुकर तोरडमल अर्थातच नाटयसृष्टीचे ‘मामा’. दमदार अभिनयाचा स्वतंत्र ठसा उमटविलेल्या तोरडमल यांनी आजवर या वेगवेगळ्या भूमिका पार पाडल्या असल्या तरी त्यांना मनापासून अभिनय करणेच आवडते.
तोरमडल यांनी रंगभूमीवर अनेक नाटकांतून विविध भूमिका केल्या. पण रसिकांच्या मनात आजही ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या नाटकातील त्यांनी रंगविलेला इरसाल ‘प्रा. बारटक्के’ घर करून आहे. नाटकाचे लेखन व दिग्दर्शन तोरडमल यांचेच होते. त्यांच्या स्वत:च्याच ‘रसिकरंजन’ नाटय़सस्थेतर्फे त्यांनी हे नाटक रंगभूमीवर सादर केले होते. नाटकाने रंगभूमीवर ‘ह’च्या बाराखडीचा ‘हाऊसफुल्ल’ इतिहास निर्माण केला. ‘रसिकरंजन’तर्फे त्यांनी या नाटकाचे एक हजारांहून अधिक प्रयोग केले. त्यानंतर अन्य नाटय़संस्थांतर्फेही हे नाटक रंगभूमीवर सादर झाले. दोन वर्षांपूर्वी या नाटकाचा संयुक्त पाच हजारांवा प्रयोग दस्तुरखुद्द तोरडमल यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
गप्पांना सुरुवात अर्थात ‘तरुण तुर्क’पासूनच झाली आणि मामांनी आठवणींचा पट उलगडताना सांगितले, ‘अहमदनगर येथील ‘अहमदनगर महाविद्यालया’त मी दहा वर्षे इंग्रजीचा प्राध्यापक म्हणून नोकरी केली. या काळात विद्यार्थ्यांशी माझा खूप जवळून संबंध आला. विद्यार्थ्यांचे बोलणे, त्यांची प्रेमप्रकरणे, त्यांच्यातील चेष्टामस्करी, महाविद्यालयीन वातावरण हे सगळे अनुभवायला मिळाले. या नाटकातील सर्व पात्रे मला त्या महाविद्यालयीन नोकरीत प्रत्यक्ष पाहायला मिळाली. या नाटकापूर्वी मी लिहिलेली ‘भोवरा’, ‘काळं बेट लाल बत्ती’ आदी नाटके गंभीर स्वरूपाची होती. त्यामुळे माझा मित्र व रंगकर्मी दामू केंकरे याने एखादे विनोदी नाटक आता लिही म्हणून सुचविले होते. त्याची सूचना मनावर घेतली आणि हे नाटक लिहिले. नाटकातील ‘प्रा. बारटक्के’ या पात्राच्या तोंडी ‘ह’ची बाराखडी आहे. अशा भाषेत बोलणारी व्यक्ती मी प्रत्यक्ष पाहिली होती. त्यामुळे नाटकात ती आणली. ‘ह’च्या बाराखडीमुळे नाटक अश्लील असल्याची टीका झाली. पण मला स्वत:ला तसे वाटत नाही. तुम्ही त्यातून जसा अर्थ काढाल तसा तो निघू शकतो. पण विशेष म्हणजे नाटकावर टीका होऊनही नाटक तुफान चालले.
मामा तोरमडल यांच्या अभिनयाची सुरुवात ही मुंबईतून शाळेपासूनच झाली. तिथे त्यांच्या ‘नाटकी’पणाचा पाया घातला गेला. ते दहा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे काका मुंबईत सांताक्रूझ पोलीस ठाण्यात अधिकारी होते. काकांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी मुंबईत आणले. ‘शेठ आनंदीलाल पोद्दार’ ही त्यांची शाळा. शाळेत पहिल्या दिवशी ओळख करून देताना त्यांनी नाटकात काम करण्याचा छंद असल्याचे वर्गशिक्षिका जयकर बाईंना सांगितले. बाईंनी ते लक्षात ठेवून गणेशोत्सवात एका नाटकाची संपूर्ण जबाबदारी मामांवरच सोपविली. चिं. वि. जोशी लिखित ‘प्रतिज्ञापूर्ती’ हे नाटक त्यांनी बसविले. दिग्दर्शन व अभिनयही त्यांनी केला. पुढे शाळेचे स्नेहसंमेलन व अन्य कार्यक्रमातून नाटक बसविण्याची जबाबदारी ओघानेच तोरडमलांकडे आली आणि त्यांनी ती यशस्वीपणे पारही पाडली. शालेय, महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी कुर्ला येथे ‘प्रीमियर ऑटोमोबाइल’ कंपनीत काही काळ ‘लिपिक’ म्हणून व पुढे नगरला महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काही काळ नोकरी केली. या काळात ‘भोवरा’, ‘सैनिक नावाचा माणूस’ आदी नाटके त्यांनी केली. राज्य नाटय़ स्पर्धेतूनही ते सहभागी झाले. स्पर्धेत त्यांनी ‘एक होता म्हातारा’ हे नाटक सादर केले होते. या नाटकात त्यांनी साकारलेल्या ‘बळीमामा’ या भूमिकेमुळे त्यांना ‘मामा’ ही बिरुदावली मिळाली आणि पुढे सगळेजण त्यांना ‘मामा’ म्हणायला लागले आणि अवघ्या मराठी नाटय़सृष्टीचे ‘मामा’ झाले. राज्य नाटय़ स्पर्धेतून नाव झाल्यामुळे व्यावसायिक रंगभूमीकडून त्यांना विचारणा होऊ लागली. प्राध्यापक म्हणून नोकरी करत असल्याने नोकरी सांभाळून ते नाटक करत होते. ही कसरत महाविद्यालयाचे प्राचार्य थॉमस यांनी पाहिली. त्यांनी तोरडमलांना अरे व्यावसायिक रंगभूमीवर जायचे असेल तर जरूर जा. एक वर्षभर काम करून बघ. नाही जम बसला तर पुन्हा इकडे महाविद्यालयात शिकवायला ये, असे सांगितले आणि तोरडमल मुंबईत आले.
तोरडमल यांनी ‘नाटय़संपदा’, ‘नाटय़मंदार’, ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’ या आणि प्रामुख्याने ‘चंद्रलेखा’च्या नाटय़संस्थेतर्फे सादर झालेल्या नाटकातून कामे केली. ‘गुड बाय डॉक्टर’, ‘गोष्ट जन्मांतरीची’, ‘चांदणे शिंपित जाशी’, ‘बेईमान’, अखेरचा सवाल’, ‘घरात फुलला पारिजात’, ‘चाफा बोलेना’, ‘म्हातारे अर्क बाईत गर्क’ आदी अनेक नाटके केली. ‘संगीत मत्स्यगंधा’ या नाटकात त्यांनी साकारलेला ‘भीष्म’ही गाजला. कमलाकर तोरणे दिग्दर्शित ‘ज्योतिबाचा नवस’ हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यानंतर ‘सिंहासन’, ‘बाळा गाऊ कशी अंगाई’, ‘आपली माणसं’, ‘आत्मविश्वास’, ‘शाब्बास सूनबाई’ हे मराठी चित्रपटही त्यांनी केले.
तोरडमल यांनी ‘अ‍ॅगाथा ख्रिस्ती’च्या २७ इंग्रजी कादंबऱ्यांचा मराठीत अनुवाद केला आहे. तसेच र. धों. कर्वे यांनी लिहिलेल्या ‘बुद्धिप्रामाण्यवाद’ या इंग्रजी लेखसंग्रहाचे मराठी भाषांतर केले आहे. त्याशिवाय ‘आयुष्य पेलताना’ (रूपांतरीत कादंबरी), एक सम्राज्ञी एक सम्राट’ (चरित्रात्मक) तसेच ‘भोवरा’, ‘काळं बेट लाल बत्ती’, ‘गुड बाय डॉक्टर’, संघर्ष’, ‘सैनिक नावाचा माणूस’, ‘लव्ह बर्ड्स’, ‘म्हातारे अर्क बाईत गर्क’, ‘मृगतृष्णा’, ‘बाप बिलंदर बेटा कलंदर’ या नाटकांचे लेखनही केले आहे.
‘तिसरी घंटा’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे. हे लिहिण्यामागचे कारण मात्र धक्कादायक आहे. ते म्हणाले, अभिनेता अरुण सरनाईक हा माझा जवळचा मित्र. कोल्हापूरला गेलो की आमची भेट ठरलेली. एका भेटीत त्याने मला सांगितले, माझ्याकडे अनुभव व आठवणींचा संग्रह खूप मोठा आहे. पण मला काही लिहिता येत नाही. त्यावर मी त्याला, अरे तू मला सांग मी लिहून काढीन असे सांगितले. पण ते अर्धवटच राहिले. कारण दुर्दैवाने अपघातात तो मरण पावला. त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी मला आकाशवाणीवर बोलावले होते. तेव्हा मी त्याला आत्मचरित्र लिहायचे होते पण आता ते अर्धवट राहिले, असे सांगितले. त्यानंतर माझ्या मनात विचार सुरू झाला आपल्याकडेही सांगण्यासारखे खूप काही आहे. उद्या आपलेही अचानक असे काही बरेवाईट झाले तर जे काही आहे ते आपल्याबरोबरच निघून जाईल. त्यातून मी आठवणी, अनुभव लिहायला घेतले आणि ‘तिसरी घंटा’ लिहून झाले. यात जे काही सांगायचे राहिले ते पुढे ‘उत्तरमामायण’ या पुस्तकाद्वारे लिहिले.
वयाच्या ८४ व्या वर्षांत असलेल्या मामांना आता गुडघेदुखी आणि ‘फ्रोजन शोल्डर’चा त्रास आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडणे शक्य होत नाही. पत्नी प्रमिला, तीन विवाहित कन्या हा त्यांचा परिवार. तीनही मुली मुंबईबाहेर असल्या तरी मुंबईतील घरी येऊन-जाऊन असतात. दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका किंवा कार्यक्रम ते पाहात नाहीत. विनोदाच्या नावावर जे काही भयानक चालते ते पाहावत नाही, असे स्पष्ट मत व्यक्त करतानाच नव्या पिढीला प्रत्येक वेळी दोष देणे योग्य नाही, असेही ते सांगतात. आजवर आयुष्य आनंदाने उपभोगले आता हा ‘भोग’ आहे. आता जुन्या आठवणींचे स्मरणरंजन हेच आपल्या उर्वरित आयुष्याचे शक्तीवर्धक, आनंद आणि समाधान असल्याचे मामा तोरडमल सांगतात..