समांतर रंगभूमीवरचं एक ध्यासपर्व, ज्यांनी समांतर नाटकांना आपली हक्काची जागा, निवारा, एक घरटं फक्त मिळवून दिलं नाही, तर त्याचं संगोपन आणि जतनंही केलं असे ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचे बुधवारी निधन झाले. वयाच्या ८९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. साठहून अधिक वर्ष रंगभूमीवर कार्यरत असणाऱ्या काकडे काकांच्या निधनाने समांतर रंगभूमीवर शोककळा पसरली आहे.

काकडे यांना संगीत नाटक अकादमी, झी मराठी जीवनगौरव, ध्यास-सन्मान या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. कोणत्याही वादात न पडता सकस नाटकं करता यावीत, यासाठी त्यांनी १९७१ साली ‘आविष्कार’ संस्थेची पायाभरणी केली. वयाची ८५ वर्षे ओलांडली तरी त्यांच्यामधील नाटकासाठी काम करण्याची ऊर्जा युवकाला लाजवेल अशी होती. आविष्कार ही संस्था त्यांनी आपल्या मुलाप्रमाणे सांभाळली.

आविष्कारने उभ्या केलेल्या छबिलदास चळवळीतून अनेक नाट्यसंस्था आणि नाट्यकर्मी पुढे आले. रंगभूमीवरचे अनेक महत्त्वाचे प्रयोग या चळवळीच्या माध्यमातून झाले. अरुण काकडे हे नाटय़ चळवळीचा आधारस्तंभ म्हणून ओळखले जायचे.