सोनूच्या गाण्याचा फिव्हर सध्या सर्वांनाच चढलेला आहे. शाळेच्या वर्गापासून कॉलेजच्या कट्ट्यापर्यंत आणि मीडियाच्या स्टुडिओपासून सरकारी कार्यालयापर्यंत सर्वत्र या सोनूचीच चर्चा आहे. सोनूच्या गाण्याची वेगवेगळी रुपंही बघायला मिळत आहेत. यात आता भर पडणार आहे ती मालवणी रुपाची. पण यात भरवश्याचा प्रश्न सोनूला नाही तर गाववाल्यांना विचारला आहे. आणि हे गाववाले आहेत ‘गाव गाता गजाली’ या झी मराठी वाहिनीवरील आगामी मालिकेतील गावकरी.

वाचा : ‘सोनू तुझा आरजेवर भरवसा नाय का?’

मालवणातील गजालीची धम्माल या मालिकेतून बघायला मिळणार आहे. याच मालिकेच्या प्रमोशनचा भाग म्हणून हा खास व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. ज्यात मालिकेत एक महत्त्वाचं पात्र साकारणारा प्रल्हाद कुडतरकर हा भरवश्याचा प्रश्न विचारतोय आणि बाकी गावकरी त्याला साथ देतायत. प्रल्हादला आपण यापूर्वी ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत पांडूच्या भूमिकेत बघितलं होतं. याही मालिकेत तो एका खास भूमिकेत प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. याशिवाय या व्हिडिओमध्ये प्रसिद्ध विनोदी अभिनेता दिगंबर नाईक, भरत सावले, किशोर रावराणे आणि इतर कलाकार हे प्रल्हादला साथ देतायत. सध्या सोशल मीडियावर या व्हिडिओने धुमाकूळ घातला असून गाववाल्यांसाठीची ही मालवणी विनंती चाहत्यांना आवडत आहे.

वाचा : पहिल्या दोन वर्षांत आमच्या हनीमूनमध्ये खूप अडथळे आले- शाहरुख खान

‘रात्रीस खेळ चाले’ आणि ‘हंड्रेज डेज’ या मालिकेचे निर्माता संतोष कणेकर यांनीच ‘गाव गाता गजाली’ची निर्मिती केली आहे. तर या गजाली लिहिण्याची आणि अभिनयातून पोहोचवण्याची दुहेरी जबाबदारी या मालिकेतही प्रल्हाद कुडतरकर पेलताना दिसणार आहे, तर दिग्दर्शन राजू सावंत यांनी केले आहे. कोकणी माणसांचा स्वभाव मुळातच गप्पिष्ट. चार मंडळी जमवून गप्पा छाटत बसणे हा कोकणी माणसांचा आवडता उद्योग. कोकणात विशेषत: सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात बोलल्या जाणाऱ्या मालवणी भाषेत या गप्पांनाच ‘गजाली’ असे म्हटले जाते. या गप्पांमध्ये गावातील भानगडी ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकारणापर्यंत सगळे विषय असतात. याच कोकणी माणसाच्या या गजाली आता ‘झी मराठी’वरून पाहायला मिळणार आहेत. ‘गाव गाता गजाली’ ही मालिका येत्या २ ऑगस्टपासून बुधवार ते शनिवार रात्री ९.३० वा. प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.