बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल हा कायम त्याच्या फिटनेसमुळे चर्चेत असतो. मात्र यावेळी एका वेगळ्या कारणामुळे तो चर्चेत आला आहे. सध्या लॉकडाउन असल्यामुळे प्रत्येक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत आहे. यात विद्युत जामवालदेखील इन्स्टाग्रामवरुन चाहत्यांच्या भेटीला येत आहे. दरवेळी फिटनेसमुळे चर्चेत राहणारा हा अभिनेता एका व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे. साधारणपणे आपण कोणतंही फळे, भाजी चिरण्यासाठी सुरी किंवा चाकू यांचा वापर करतो. मात्र विद्युतने सिगारेटच्या माध्यमातून लिंबू कापून दाखवलं आहे.
धुम्रपान करणे किंवा सिगारेट ओढणं हे शरीरासाठी घातक आहे हे आपण सारेच जाणतो. पण विद्युतने या सिगारेटच्याच मदतीने लिंबू कापून दाखवलं आहे. सध्या त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
‘जंगली’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ज्यावेळी विद्युत केरळला गेला होता. त्यावेळी ही भन्नाट आयडिया तो शिकला, असं त्याने सांगितलं. सोबतच लिंबाव्यतिरिक्त तुम्ही कोणतंही फळ असं कापू शकता हेदेखील त्याने सांगितलं.
दरम्यान, विद्युतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांकडून त्याला पसंती मिळत आहे. विद्युतने खलनायक म्हणून कलाविश्वात केलं. पण पीळदार शरीरयष्टी आणि स्टंट्स-फाइट्सच्या जोरावर त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्याने ‘कमांडो’ या चित्रपटाच्या दोन्ही भागांतून आपला चाहता वर्ग तयार केला.