श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथ्थया मुरलीधरनच्या आयुष्यावरील ८०० या बायोपिकमधून दक्षिणेतील अभिनेता विजय सेतुपती याने माघार घेतली आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या मुथ्थया मुरलीधरनच्या जीवनावर आधारीत या चित्रपटामध्ये विजय सेतुपती मुख्य भूमिका साकारणार होता. मात्र निर्मात्यांनी चित्रपटाची घोषणा केल्यानंतर सोशल मीडियावर या चित्रपटाला जोरदार विरोध सुरू झाला. त्यामुळे विजय सेतुपतीला या चित्रपटातून माघार घ्यावी लागली. मुथ्थया मुरलीधरननं लिहिलेलं एक पत्र ट्विट करत विजय सेतुपतीने या चित्रपटाला रामराम ठोकला आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला होता.

विजय सेतुपतीने ‘थँक्यू .. बाय…’ असे लिहित मुथ्थया मुरलीधरनं लिहिलेलं पत्र ट्विट केलं आहे. या पत्रात मुथ्थया मुरलीधरनं विजय सेतुपतीला ‘८००’ चित्रपटातून माघार घेण्याची विनंती केली आहे. तमिळनाडूच्या या महान कलाकाराला कोणत्याही प्रकारचे नुकसान होवू नये, अशी माझी इच्छा आहे. म्हणूनच विजय सेतूपती यांनी या चित्रपटातून बाहेर पडावे अशी माझी इच्छा आहे, असं मुरलीधरन यांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे.

 

का होत आहे विरोध?

काही दिवसांपूर्वी मुथय्या मुरलीधरननं आपली बायोपिकची घोषणा केल्यानंतर क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं. मात्र तमिळनाडुमध्ये या चित्रपटाला मोठा विरोध करण्यात आला. सोशल मीडियावर विजय सेतुपतीला ट्रोल करण्यात येवू लागले. या विरोधाला खरंतर १९८३ ते २००९ पर्यंत श्रीलंकेत सुरू असलेल्या गृहयुद्धाची पार्श्वभूमी आहे. श्रीलंकेत तमिळ हे अल्पसंख्याक आहेत. श्रीलंकेत सिंहली लोकांकडून तमिळ लोकांवर बऱ्याच वर्षांपासून अत्याचार करण्यात येत होते. त्यामुळे झालेल्या गृहयुद्धात असंख्य तामिळींना आपला जीव गमवावा लागला होता. श्रीलंकेत तामिळी लोकांवर इतके अत्याचार झाले असताना, तिथल्या क्रिकेटरच्या बायोपिकमध्ये विजय सेतुपतीने काम करणं योग्य नाही, असे काही युजर्सनं म्हटलं होतं.