तामिळ सुपरस्टार विजयची प्रमुख भूमिका असलेला ‘सरकार’ दिवाळीत प्रदर्शित झाला. या चित्रपटानं कमाईचा विक्रमही रचला. मात्र याच चित्रपटामुळे तामिळनाडूमधलं राजकरण आता चांगलंच तापू लागलं आहे. या चित्रपटात अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा आणि तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्याविषयी काही आक्षेपार्ह दृश्य दाखवण्यात आली आहे. त्यामुळे तामिळनाडूत सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे.

गुरुवारी दुपारनंतर अण्णाद्रमुकच्या कार्यकर्त्यांनी ‘सरकार’चे शो बंद पाडले होते. तर त्याच दिवशी उशीरा रात्री या चित्रपटाचे दिग्दर्शक ए.आर . मुरुगादास यांच्या घरी पोलीस पोहोचले. मात्र मुरुगादास घरी नसल्याचं लक्षात येताच पोलीस निघून गेले. मुरुगादास यांनी ट्विट करत माहिती दिली.

तामिळ चित्रपट निर्मात्या संघटनाचे अध्यक्ष विशाल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘या चित्रपटाला सेन्सॉरनं कट दिलेला नाही. चित्रपट अर्ध्याधिक प्रेक्षकांनी पाहिला आहे. मग आता या चित्रपटाला विरोध करून राजकारण करण्याची काय गरज आहे?’ असा प्रश्न त्यांनी ट्विटरद्वारे विचारला आहे. ‘सरकार’ हा तामिळनाडूमधला सुपरहिट चित्रपट ठरला आहे. तामिळनाडूतल्या राजकारणाची काळी बाजू यात दाखवण्यात आली आहे, म्हणूनच या चित्रपटावर राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला आहे.

तर दुसरीकडे दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हसन आणि रजनीकांत दोघंही या चित्रपटाच्या समर्थनार्थ उतरले आहेत. ‘ज्या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र दिलं आहे अशा चित्रपटावर आक्षेप घेण्याचं कारण काय? निर्माता- दिग्दर्शकांवर दबाव टाकायचा ही अण्णा द्रमुकची पहिल्यापासूनची खेळी आहे. ज्या पक्षाला टीका सहन होत नाही तो पक्ष सत्तेत फार काळ राहू शकत नाही. सत्तेच्या या दलालांचं लवकरच पतन होईलच.’ असं ट्विट कमल हसन यांनी करत अण्णा द्रमुक पक्षावर टीका केली आहे.

तर रजनीकांत यांनीदेखील निषेध केला आहे. ‘ज्या चित्रपटाला सेन्सॉरनं मानत्या दिली आहे त्याला विरोध करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. चित्रपटाचे पोस्टर फाडणं, शो बंद पाडणं हे पूर्णपणे निंदनीय आहे. मी अशा गोष्टीचा निषेध करतो अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.