‘राझी’, ‘तलवार’ यांसारख्या चित्रपटानंतर दिग्दर्शिका मेघना गुलजार अॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अगरवाल हिच्या जीवनसंघर्षावर आधारित नवीन चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटात बॉलिवूडमधली आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोन प्रमुख भूमिकेत असणार आहे. पण, त्याचबरोबर मेघनानं या चित्रपटात दीपिकासोबत काम करण्याची मोठी संधी अभिनेता विक्रांत मेस्सीला दिली आहे. आतापर्यंत अनेक चित्रपटात सहकलाकाराची भूमिका साकारणारा विक्रांत ‘छपाक’ चित्रपटातून प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

विक्रांत लक्ष्मीचे पती आलोक दीक्षितच्या भूमिकेत दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. स्वत: मेघना गुलजारनं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आलोकनं स्वत:ला सामाजिक कार्यात वाहून घेतलं आहे. लक्ष्मी सोबतच अॅसिड हल्ल्यातील पीडितांची तो मदत करत करतो. विशेष म्हणजे दीपिकाही विक्रांतसोबत काम करण्यास खूपच उत्सुक आहे. या चित्रपटासाठी अभिनेता राजकुमार रावच्या नावाचीही चर्चा होती. अद्याप राजकुमारच्या नावाला दुजोरा दिलेला नाही. मात्र तो या चित्रपटात नकारात्मक भूमिकेत दिसू शकतो.

‘अॅसिड हल्ल्यातून लक्ष्मी बचावली. आज अॅसिड हल्ल्यात सर्वस्व गमावणाऱ्या कित्येक तरुणींच्या मदतीला धावून जाणारी व्यक्ती म्हणून लक्ष्मी ओळखली जाते. या लढणाऱ्या पीडितांचा ती खरा चेहरा आहे. अॅसिड हल्ल्यांविरोधात कठोर कायदा, आधुनिक उपचारपद्धती, पीडितांसाठी भरपाई यांसारख्या गोष्टी मला या चित्रपटातून दाखवायच्या आहेत. आज अॅसिडला बंदी असून ते अनेक छोट्या शहरात सहज उपलब्ध होतं. लक्ष्मीवर अॅसिड हल्ला झाला पण तिनं हार मानली नाही. ती अन्यायाविरोधात लढली.

तिच्यावर अॅसिड फेकणाऱ्या आणि या हल्ल्यात सहभागी असणाऱ्या दोघांना शिक्षा होईपर्यंत ती लढत राहिली. तिघांनाही शिक्षा झाल्यावर स्वस्थ न बसता २००६ सालीच तिने जनहित याचिकेद्वारे अ‍ॅसिडहल्ला पीडितांसाठी विशेष कायदे असावेत, अंगावर अ‍ॅसिड फेकण्याचा उल्लेख असलेले कलम सध्याच्या फौजदारी कायद्यात आणि दंडसंहितेत असावे यासाठी आवश्यक दुरुस्त्या कराव्यात, अशा मागण्या न्यायपीठापुढे मांडल्या. याचा पाठपुरावा ती करत राहिली अखेर तिच्या लढ्याचा यश आलं. हे सारं मला जगासमोर आणायचं होतं म्हणूनच मी लक्ष्मीची कहाणी निवडली असं मेघना म्हणाली.

लक्ष्मी अगरवालविषयी थोडक्यात
दिल्लीच्या गरीब कुटुंबातील लक्ष्मीला तिच्या मैत्रिणीच्या भावाने (वय ३२) मागणी घातली, तेव्हा तिचे वय होते १६. तिचा नकार मिळाल्यावर त्याने अ‍ॅसिड फेकून तिचा चेहरा विद्रूप केला. २२ एप्रिल २००५ साली घडलेल्या घटनेनं सारा देश हादरला होता. तेव्हापासून वयाच्या पंचविशीपर्यंत तिने फक्त अ‍ॅसिडहल्ल्याशी झुंज दिली. तिच्या चेहऱ्यावर चार शस्त्रक्रिया करण्यात आल्या. लक्ष्मी ही अॅसिड हल्ल्यातील पीडितांच्या हक्कांसाठी सध्या काम करत आहे. २०१४ मध्ये लक्ष्मीला ‘इंटरनॅशल विमेन ऑफ करेज अवॉर्ड’नं सन्मानित करण्यात आलं होतं.