गुन्हे आणि त्यानंतर होणारी त्याची तपास प्रक्रिया या साऱ्यावर भाष्य करणाऱ्या कार्यक्रमांच्या यादीत ‘क्राईम पेट्रोल’ आणि ‘सावधान इंडिया’ या दोन कार्यक्रमांचं नाव अग्रस्थानी येतं. ‘क्राईम पेट्रोल’ या कार्यक्रमाचे अनेक सीझन्स प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. असं असलं तरीही ‘सावधान इंडिया’ या कार्यक्रमावर मात्र संकट आल्याचं चित्र आहे. कारण या कार्यक्रमाचं चित्रीकरण एकाएकी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या सहा वर्षापांसून छोट्या पडद्यावर टीआरपी रेटींगमध्येसुद्धा बाजी मारणाऱ्या या कार्यक्रमाविषयी हा निर्णय नेमका का घेण्यात आला, हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे.

एका वेब पोर्टलने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार ‘सावधान इंडिया’ बंद होणार असल्याची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसली, तरीही या मालिकेचं चित्रीकरण तात्काळ थांबवण्याचे निर्देश देण्यात आल्याचं कळत आहे. आठ वेगवेगळ्या निर्मिती संस्थांअंतर्गत ‘सावधान इंडिया’ हा कार्यक्रम साकारण्यात येतो. पण, एकाएकी तो बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे अनेकांना धक्काच बसला आहे. गुन्हेगारी विश्व आणि काही प्रसंगांचं अतिरंजित आणि नाट्यमय चित्रण करतेवेळी त्यात अतिशयोक्ती करण्यात येत असल्याच्या तक्रारी आल्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज बांधण्यात येत आहे.

‘लाइफ ओके’ या वाहिनीवर ‘सावधान इंडिया’ या कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच या वाहिनीला ‘स्टार भारत’ने टेक ओव्हर केलं. पण, ‘सावधान इंडिया’ हा प्रचंड लोकप्रिय कार्यक्रम त्या वाहिनीवरही सुरु ठेवण्यात आला होता. सध्याच्या घडीला अभिनेता सुशांत सिंह या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळत आहे. सुशांतशिवाय मोनिष बहल, सिद्धार्थ शुक्ला, पूजा गौर, शिवानी तोमर, हितेन तेजवानी आणि दिव्या दत्ता यांनीसुद्धा या कार्यक्रमाच्या काही भागांचे सूत्रसंचालन केले होते.

वाचा : अठराव्या वर्षीच तिने अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ‘हा’ अनोखा विक्रम आपल्या नावावर नोंदवला

‘सावधान इंडिया’ या कार्यक्रमावर आलेली ही टांगती तलवार पाहता येत्या काळात बऱ्याच कलाकारांच्या कारकिर्दीवर संकट येण्याची चिन्ह आहेत. ज्युनिअर आर्टीस्टपासून ते नवोदित कलाकारापर्यंत बरेच चेहरे या कार्यक्रमाशी जोडले गेल्यामुळे त्यांना मिळणाऱ्या कामाचं पुढे काय, हाच प्रश्न आता या कलाकारांना भेडसावू लागल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता मालिकेशी संलग्न व्यक्तींकडून याविषयी कोणती अधिकृत घोषणा करण्यात येते का, याकडेच टेलिव्हिजन विश्व आणि चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.