करोना विषाणूने सध्या संपूर्ण देशात थैमान घातले. आतापर्यंत लाखो लोकांना या प्राणघातक विषाणूची लागण झाली आहे. शेकडो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. परंतु या विषाणूवर मात करणारी कुठलीही अधिकृत लस अद्याप तयार झालेली नाही. परिणामी डॉक्टर्स, वैद्यकिय तज्ज्ञ व सरकार सातत्याने लोकांना घरातच राहण्याचा सल्ला देत आहे. मात्र सतत सांगूनही काही मंडळी विनाकारण घराबाहेर पडतात व त्यांना करोनाची लागण होते. अशा मंडळींना जागृत करण्यासाठी कोलकाता पोलिसांनी अनोखी शक्कल लढवली आहे. त्यांनी स्पायडरमॅनचा एक गंमतीशीर व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हायरल होणारा हा व्हिडीओ सध्या सर्वत्र चर्चेत आहे.

अवश्य पाहा – जवळ कोणीच नसतं, हात थरथरतात; बिग बींनी सांगितलं रुग्णालयातील भयाण वास्तव

स्पायडरमॅन म्हटलं की उंचच उंच इमारतींवरुन उड्या मारणारा एक सुपरहिरो आपल्या डोळ्यांसमोर येतो. मात्र या व्हिडीओमधील स्पायडरमॅन लॉकडाउनमुळे चक्क लिफ्टमधून प्रवास करताना दिसतोय. पोलिसांच्या भीतीमुळे तो बाहेर जाऊन उडू शकत नाही. या गंमतीशीर व्हिडीओमार्फत पोलिसांनी नागरिकांना घरातच थांबण्याचा सल्ला दिला आहे. हा आश्चर्यचकित करणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

भारतात करोनाग्रस्तांच्या संख्येनं गाठला १४ लाखांचा टप्पा

जगभरात तसंच देशातही करोनानं थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीत देशातही करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, रविवारी देशात करोनाबाधितांच्या संख्येनं १४ लाखांचा टप्पा ओलांडला. रविवारी मिळालेल्या माहितीनुसार देशात करोनाग्रस्तांची संख्या आता १४ लाख ११ हजार ९५४ वर पोहोचली आहे. covid19india.org ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार सध्या देशात ४ लाख ७७ हजार २२८ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत ९ लाख १ हजार ९५९ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत करोनामुळे ३२ हजार ३५० जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही समोर आली आहे.