भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने सोमवारी संध्याकाळी त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला. ‘विरुष्का’च्या लग्नाची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि सोशल मीडियावरसुद्धा त्यांचेच फोटो झळकत होते. ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुक सर्वत्र विराट-अनुष्काच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ पाहायला मिळत आहेत.

विरुष्काचे लग्नानंतरचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्नानंतरच्या पार्टीतील हे फोटो असून यामध्ये अनुष्काच्या हातात ‘चूडा’सुद्धा पाहायला मिळतोय.

वाचा : ‘मैंने प्यार किया’ पाहून झीनत अमान यांना धक्काच बसलेला

इटलीतील टस्कनी येथे त्यांचा विवाहसोहळा पार पडला. अगदी मोजके लोक या सोहळ्याला उपस्थित होते. तर याउलट रिसेप्शन मोठ्या थाटामाटात पार पडणार असल्याचं म्हटलं जात आहे. दिल्लीत २१ डिसेंबर तर मुंबईत २६ डिसेंबर रोजी रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे. या रिसेप्शनला क्रिकेट आणि बॉलिवूड विश्वातील सेलिब्रिटी हजेरी लावतील.