बॉलीवूडमध्ये सध्या कुठल्या घटनेवरून नेमक्या कशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटतील याचा अंदाज लावणेच दिवसेंदिवस कठीण होऊन बसले आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे हे कलाकार समाजमाध्यमांवरून सध्या आपले वाद चव्हाटय़ावर आणत असल्याचेही कित्येकदा दिसून येते. मात्र एकाच घटनेवर उमटणाऱ्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहता इंडस्ट्रीतील लोकांच्या मनातच सुरू असलेल्या गोंधळाचे चित्र जाहीररीत्या दिसते आहे. गेल्या आठवडय़ात अभिनेता विवेक ओबेरॉयने ट्वीट केलेल्या मीमवरून त्याला सोनम कपूरसारख्या अभिनेत्रींच्या आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या रोषाला सामोरे जावे लागले. एकीकडे महिला आयोगाने घेतलेल्या या भूमिकेचे कौतुक होते आहे तर दुसरीकडे यातही आयोग पक्षपातीपणाच करत असल्याचे सांगत कंगनाची बहीण रंगोली हिने समाजमाध्यमांवरून आयोगावर जोरदार टीका केली आहे.

कंगना राणावत आणि हृतिक रोशन प्रेमप्रकरण, त्यातून सुरू झालेले वादंग आणि आरोप-प्रत्यारोप थांबले असावेत, असे वाटत होते. मात्र गेले काही दिवस कंगनाची बहीण रंगोलीने तिच्याबाबतीत होणाऱ्या प्रत्येक वादात समोरच्यांवर झणझणीत टीका करत कंगनाची बाजू सांभाळण्याचा प्रयत्न कसोशीने सुरू ठेवला आहे. हृतिक रोशन प्रकरणानंतर ‘मणिकर्णिका’ चित्रपटाच्या वेळी पुन्हा एकदा कंगना विरुद्ध इंडस्ट्री असा वाद उफाळून आला होता. त्यानंतर कंगनाने पुन्हा एकदा आदित्य पांचोलीवर बलात्काराचा आरोप करत वातावरण पेटवून दिले. आणि आता पुन्हा एकदा विनाकारण कंगना-हृतिक वादानेही तोंड वर काढले आहे. कंगना राणावतचा ‘मेंटल है क्या’ आणि हृतिक रोशनचा ‘सुपर ३०’ हे दोन चित्रपट एकाच तारखेला प्रदर्शित होत आहेत. हृतिक रोशनच्या चित्रपटाची तारीख आधीच जाहीर करण्यात आली होती. कंगनाचा चित्रपट सुरुवातीला २१ जुलैला प्रदर्शित होणार होता, मात्र चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख नुकतीच २६ जुलैला पुढे ढकलण्यात आली. त्यावरून कंगनाने जाणूनबुजून हृतिकला त्रास देण्यासाठी हा प्रकार केल्याची चर्चा सुरू झाली. मात्र या वेळी ‘मेंटल है क्या’ चित्रपटाची निर्माती एकता कपूर मध्ये पडली. कंगनावर टीका करण्यात अर्थ नाही. चित्रपटाची तारीख ही निर्माता म्हणून आपणच बदलण्याचा निर्णय घेतला. वितरकांच्या सल्ल्यावरूनच अल्ट बालाजीला हा निर्णय घ्यावा लागल्याचेही एकताने अधिकृत निवेदन देऊन स्पष्ट केले. मात्र कंगनाबद्दलची नाराजी थांबत नव्हती. तेव्हाही रंगोलीने समाजमाध्यमांवर कंगनाला हृतिककडूनच कसा त्रास होतो आहे, याबद्दल ट्वीट केले होते. पण अनेकदा या गोष्टींवर जाहीर चर्चा करूनही आजपर्यंत कंगनाची बाजू कोणीही घेतलेली नाही, याचा राग विवेक ओबेरॉयला महिला आयोगाने सुनावलेल्या आदेशाच्या निमित्ताने रंगोलीने व्यक्त केला आहे.

विवेक ओबेरॉयने केलेले ट्वीट म्हणजे पोरखेळ होता. त्याने विनोदी, अर्थहीन मीम ट्वीट केला आणि त्यामुळे एका अभिनेत्रीची नाहक बदनामी केल्याबद्दल राष्ट्रीय महिला आयोगाने तत्काळ कारवाई केली. पण हाच आयोग जेव्हा कंगनाला त्यांची खरंच गरज होती तेव्हा हातावर हात ठेवून बसला होता, याबद्दल रंगोलीने राग व्यक्त केला आहे. एका फुटकळ विनोदामुळे झालेली मानहानी रोखण्यासाठी आयोगाकडे वेळ आहे, पण आज देशभरात इतक्या बलात्काराच्या, लैंगिक छळाच्या घटना होत आहेत. त्यासंबंधी अनेकांना न्याय मिळालेला नाही त्याबद्दल आयोग काहीच करत नाही, अशी टीकाही तिने केली आहे. कंगनाने एका मोठय़ा अभिनेत्याविरोधात केलेली तक्रार दाखल करून घ्यायलाही महिला आयोगाने दिलेला नकार मी कधीच विसरू शकणार नाही, असे रंगोलीने म्हटले आहे.

या सगळ्या वादात दुसऱ्याच दिवशी आपले मीम ट्वीट मागे घेणाऱ्या विवेक ओबेरॉयने माफी मागण्यास नकार दिला आहे. मी कोही चुकीची गोष्ट केलेली नाही, कोणत्याही स्त्रीला दुखावण्याचा माझा उद्देश नव्हता. माझ्यावर झालेला विनोद मी हसतखेळत स्वीकारला आणि तो तितक्याच सहजतेने ट्वीट केला. त्यातून असा काही अनर्थ होईल याची कल्पना नव्हती. मात्र लोक आता मला यासाठी तुरुंगातच पाठवायला निघाले आहेत. मी कुठलाही गुन्हा केलेला नाही, असे सांगत विवेकने माफी मागण्यास नकार दिला आहे.