रेश्मा राईकवार

चित्रपट : वॉर

दोन जबरदस्त अ‍ॅक्शन हिरो एकत्र येतात तेव्हा काही तरी भन्नाट पाहायला मिळणार, अशीच प्रेक्षकांची अटकळ असते. किंबहुना, हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ या दोघांना एकत्र आणत हाणामारीचा पाऊस पाडायचा याच हेतूने दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी ‘वॉर’ची मांडणी केली आहे. त्यामुळे चित्रपटाच्या पहिल्या फ्रेमपासून शेवटच्या पंधरा मिनिटांपर्यंत उगाचच ताणलेल्या फ्रेमपर्यंत अत्यंत शैलीदार हाणामारी अनुभवण्याची संधी या चित्रपटाने दिली आहे. पण अर्थात या दोघांना एकत्र आणण्यासाठी काही तरी हटके गोष्ट हवी होती, इथे अनेकदा पाहिलेले प्रसंग एकत्र आणत एक गोष्ट बनवली आहे. आणि त्यात फक्त आणि फक्त एकच नायक केंद्रस्थानी असल्याने दुसरा नाहक बळी पडला आहे.

हल्ली हिंदी चित्रपटांची कथा ही कोणत्याही अंडरकव्हर अधिकाऱ्याशिवाय सुरूच होत नाही. त्यामुळे इथेही नवा तरुण अधिकारी खालिदवर (टायगर श्रॉफ) त्यांचाच गुरू रॉ एजंट कबीर (हृतिक रोशन) याला शोधून ठार करण्याची कामगिरी दिली जाते. एकेकाळी देशासाठी जीवही द्यायची आणि घ्यायची तयारी असलेला आपला गुरू असा चुकीच्या वळणावर का गेला, याचा माग काढत खालिद आणि कबीरचा ससेमिरा सुरू होतो. या दोघांचे ध्येय एकच आहे ते म्हणजे एकेकाळी उद्योजक असलेला आणि आता आंतरराष्ट्रीय गुन्हेगार झालेल्या रिझवान इलियासीला मारायचे.

रिझवानच्या मागे कबीर आणि कबीरच्या मागे खालिद.. या एकाच सूत्रावर दिग्दर्शकाने गोष्ट फिरवली आहे. अ‍ॅक्शनपटांसाठी ज्या पद्धतीची वेगवान मांडणी आवश्यक असते, ती मांडणी आणि हॉलीवूडच्या जवळ जाणारा दर्जा या दोन्ही कसोटय़ांवर दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद खरा उतरला आहे. हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ या दोघांनाही कधी एकत्र आणत, कधी एकमेकांसमोर उभे करत त्यांच्या अ‍ॅक्शन कौशल्याचा पुरेपूर वापर दिग्दर्शकाने चित्रपटात करून घेतला आहे.

क्वचित काही प्रसंगांत या दोन कलाकारांमधले काही मिश्कील क्षण अनुभवयाला मिळतात, मात्र त्याचे प्रमाण हाणामारी आणि पाठलागदृश्यांच्या तुलनेत अगदीच नगण्य आहे. मुळात या दोघांमधली जुगलबंदी अनुभवण्यासाठीच प्रेक्षक तिकीट काढून बसलेला असतो, त्यामुळे त्याची ती हौस पूर्ण होते. मात्र, या दोघांना एकत्र आणणाऱ्या गोष्टीत काही नावीन्य असते तर चित्रपट अधिक उजवा ठरला असता.

हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ दोघांनीही चित्रपटात उत्तम काम केलं आहे. हृतिककडे अनुभवाचे पारडे अर्थातच जड आहे. एकतर अनुभवी अधिकारी म्हणून त्याला दिलेला रफ लूक, त्याची देहयष्टी आणि देहबोली यामुळे रॅम्बो स्टाईल कबीरच्या भूमिकेत त्याला पाहणे ही पर्वणी ठरते. त्या तुलनेत खालिदच्या व्यक्तिरेखेला लेखक-दिग्दर्शकाने कथेतच मर्यादा आणल्या आहेत. त्यामुळे हृतिकसमोर त्याच सहजतेने उभे राहात टायगरने आपली भूमिका उत्तम वठवली असली तरी त्याचा प्रभाव तुलनेने कमी पडतो. या दोघांवरच खरे तर हा चित्रपट बेतलेला आहे. बाकी खलनायकाचा उल्लेख हा या दोघांना झुंझवण्यापुरताच आहे. त्यामुळे चित्रपटात आशुतोष राणासारखा एक उत्तम कलावंत आहे, पण त्याला मध्ये मध्ये येऊन जाब विचारण्याशिवाय फार वावच ठेवलेला नाही. सोनी राझदानही छोटेखानी भूमिकेत दिसतात. वाणी कपूर तर चित्रपटात कधी येते, कधी जाते हे कळतही नाही. त्या तुलनेत अभिनेत्री अनुप्रिया गोएंका हिच्या वाटय़ाला चांगली भूमिका आली आहे. दोन चांगल्या कलाकारांना एकत्र आणताना कुठे तरी समतोल साधला गेला तर त्यात मजा अनुभवता येते. इथे काहीअंशी हा चित्रपट एकाच व्यक्तिरेखेकडे झुकलेला वाटतो. दुसरी व्यक्तिरेखा कधी चांगली-कधी नकारी अशी खेळवत स्वत:च त्यातला जीव दिग्दर्शकाने काढून टाकला आहे. आता इथे नेमके कोण कमी पडले हे पाहण्यासाठी ‘वॉर’ पाहण्याशिवाय गत्यंतर नाही. मात्र हृतिक आणि टायगर यांचे एकत्र नृत्यकौशल्य आणि युद्धकौशल्य अनुभवण्याची तेवढीच संधी हा चित्रपट देतो, यात शंका नाही.

दिग्दर्शक – सिद्धार्थ आनंद

कलाकार – हृतिक रोशन, टायगर श्रॉफ, वाणी कपूर, आशुतोष राणा, अनुप्रिया गोएंका, सोनी राजदान, अरिफ झकेरिया.