नवीन वर्षात बॉलिवूडमध्ये काही वेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट येणार आहेत. यातला एक चित्रपट म्हणजे ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ होय. भारताच्या मंगळ मोहिमेवर आधारित या चित्रपटात आर माधवन प्रमुख भूमिकेत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर माधवननं तीन ते साडेतीन वर्षे काम केलं. या चित्रपटात आर माधवन इस्रोचे भूतपूर्व शास्त्रज्ञ नंबी नारायण यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटातील आर माधवनचा लूक पहिल्यांदाच समोर आला आहे. नंबी सरांसारखा हुबेहूब लूक येण्यासाठी माधवननं अडीच वर्षे मेहनत घेतली. ही भूमिका माझ्या आयुष्यातील सर्वात आव्हानात्मक भूमिका होती असंही माधवन म्हणाला.

“सलग दोन दिवस खुर्चीवर बसून राहणे फार कठीण होते. सुरुवातीला हे सगळं सोपं वाटलं पण मला समजलं की याच शारीरिक तणाव फार होतं आहे. मी साकारत असलेल्या पात्राचं वय ७०-७५ वर्षे आहे म्हणून माझ्यासाठी हा रोल एक आव्हान होतं. नंबी यांचं व्यक्तिमत्व खूप चांगले व तेजमय आहे. म्हणूनच हुबेहूब त्यांच्यासारखा लूक साकारण्यासाठी मला अडीच वर्षे लागले. कदाचित हा माझ्या चित्रपट कारकिर्दीतला सगळ्यात कठीण रोल आहे” असं म्हणत माधवननं आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘मी जेव्हा पहिल्यांदा मेकअप करून सेटवर गेलो तेव्हा माझा लुक पाहून नंबी सरांचं हसू थांबतच नव्हतं. सेटवर मी आणि नंबी सर दोघंही एकसारखेच दिसायचो त्यामुळे अनेकांचा गोंधळ उडायचा’ असं म्हणत माधवननं सेटवरचा किस्साही सांगितला.

भारतीय अवकाश संशोधन संस्थेतील (इस्रो) भूतपूर्व शास्त्रज्ञ एस. नंबी नारायणन यांच्या जीवनावर रॉकेट्री: नंबी इफेक्ट हा चित्रपट आधारित आहे. १९९४मध्ये हेरगिरी प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. नंबी नारायणन यांनी भारताच्या अंतराळ कार्यक्रमाबाबतचा गोपनीय दस्तऐवज परकीयांच्या स्वाधीन केल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यांची कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

इंग्रजी, हिंदी आणि तमिळ अशा तीन भाषेत रॉकेट्री: नंबी इफेक्ट हा चित्रपट या वर्षांत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं शुटिंग भारत, प्रिन्सटन, स्कॉटलंड, फ्रान्स आणि रशियामध्ये केलं आहे.