मनोरंजनाच्या परिभाषा दर दिवसागणिक बदलत असतात. पण, त्यातही भारतीय कलाविश्वातून बऱ्याच चित्रपटांता नजराणा सादर करत नवनवीन कथांना तंत्रज्ञानाची आणि कलाकारांच्या अभिनयाची जोड देत तितक्याच प्रभावीपणे सादर करण्यात येत आहे. पण, ज्येष्ठ अभिनेता डॅनी डँझोपा यांचं मत मात्र जरा वेगळं आहे.

आंतरराष्ट्रीय मनोरंजन विश्वात एकिकडे भारतीय कलाविश्वाची चर्चा असताना डॅनी मात्र या मताशी सहमत नसल्याचं कळत आहे. ‘दरवर्षी आपल्या कलाविश्वात जवळपास ११०० चित्रपट साकारले जातात. तर हॉलिवूडमध्ये ४५० च्या आसपास चित्रपट साकारले जातात. कोरिया आणि फ्रान्समध्ये तर हा आकडा आणखी कमी आहे. पण, तरीही त्यांच्या चित्रपटांना आंतरराष्ट्रीय मनोरंजन विश्वात एक वेगळीच ओळख मिळते. बऱ्याच चित्रपट महोत्सवांमध्येही या चित्रपटांचा गौरव करण्यात येतो. त्या तुलनेत आपण मात्र या दूरदूरपर्यंत या स्पर्धेत नसतो’, असं डॅनी म्हणाल्याचं वृत्त ‘हिंदुस्तान टाइम्स’ने प्रसिद्ध केलं आहे.

DANNY
DANNY

वाचा : मध्यंतरातील संवाद

भारतीय चित्रपटसृष्टीत धाडसी निर्णय घेत चित्रपटांच्या बाबतील कोणताही धोका पत्करण्याचं प्रमाण कमी असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. ‘इथे चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर प्रत्येकजण त्यातून आपल्याला नफा मिळतो का, याचाच विचार करत असतो. त्यांना कोणताही धोका घ्यायचा नसतो’, असं ते म्हणाले. आपलं म्हणणं पटवून देताना ते म्हणाले, इथे अगदी यशाच्या शिखरावर पोहोचलेले कलाकार मंडळी, मोठ्या निर्मिती संस्थाच अशी पावलं उचलत कलेसाठी धोका पत्करतील अशी आशा आहे.

बॉक्स ऑफिसच्या वाढत्या वेडापायीच हे सध्याचं वातावरण पाहायला मिळत असल्याचंही ते म्हणाले. चित्रपटात गुंतवल्या जाणाऱ्या पैशांपासून ते अगदी त्याच्या कमाईपर्यंत प्रत्येक गोष्टीचं महत्त्वं लक्षात घेत त्याविषयी त्यांनी वक्तव्य केलं. व्यावसायिक पातळीवर चित्रपट यशस्वी ठरावा या एका गोष्टीकडेच जास्त कल असल्यामुळे आपल्या कलाविश्वाला मात्र या वृत्तीचा फटका बसत असल्याचं खंत त्यांनी व्यक्त केली.