सत्य घटनेवर आधारित आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. दिल्लीमधील निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणावर आधारित दिल्ली क्राइम ही वेब सीरिजही प्रेक्षकांच्या भेटीला आली. निर्भया प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरुन गेला. या प्रकरणानंतर संपूर्ण देशभरात मोर्चे, कॅण्डल रॅली, निदर्शन करत लोकांनी आपला संताप व्यक्त केला होता. हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं. निर्भया प्रकरणानंतर कायद्यातही काही महत्त्वाचे बदल करण्यात आले. नेमक्या याच घटनेवर आधारित ‘दिल्ली क्राइम’ ही वेब सीरिज आहे. त्यानंतर आता या सीरिजचा दुसरा भाग ‘दिल्ली काइम २’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या सीरिजमध्ये दिल्लीतील डेप्युटी कमिश्नर अभिषेक सिंह स्वत: काम करणार आहेत.

‘दिल्ली क्राइम सीजन२’ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असून या सीरिजमध्ये आयएएस अधिकारी अभिषेक सिंह स्वत: झळकणार असल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली आहे.या सीरिजमध्ये अभिषेक सिंह यांची महत्त्वाची भूमिका आहे. विशेष म्हणजे या सीरिजमध्ये ते त्यांचीच भूमिका वठविणार आहेत. त्यामुळे खऱ्याखुऱ्या आयुष्यातील अभिषेक सिंह या सीरिजमध्ये तिच भूमिका ऑनस्क्रीन साकारताना दिसणार आहेत.

सध्या अभिषेक सिंह दिल्लीमध्ये डेप्युटी कमिश्नर या पदावर कार्यरत आहे. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे त्यांची खास ओळख आहे. तसंच अभिषेक यांनी राजधानी दिल्लीमधील अवैध बांधकामांच्या विरोधातील करवाईचे नेतृत्व केले असून दिल्लीची सर्वात लोकप्रिय ऑड-इवन ट्रॅफिक योजना देखील त्यांच्याच देखरेखी खाली राबवली गेली होती.