वेब सीरिजच्या या विश्वात काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘सेक्रेड गेम्स’ या सीरिजची चर्चा सध्या सुरु आहे. सोशल मीडियापासून ते कॉर्पोरेट ऑफिसपर्यंत प्रत्येक ठिकाणी या सीरिजशी निगडीच अनेक प्रश्न, विनोद, मीम्स याविषयीच बोललं जात आहे. या साऱ्यामध्ये सर्वाधिक प्रकाशझोतात येणारा मुद्दा म्हणजे ‘सेक्रेड गेम्स’मधील कुक्कू. अतिशय लहान पण, तितक्याच प्रभावी अशा ट्रान्सजेंडरच्या भूमिकेसाठी या सीरिजमधील ‘कुक्कू’ म्हणजेच अभिनेत्री कुब्रा सैत हिने अनेकांचीच मनं जिंकली आहेत.

सोशल मीडियावर सध्या तिच्याविषयीच जास्त सर्च केलं जात असून, ती खरंच ट्रान्सजेंडर आहे का?, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याविषयी जेव्हा कुब्राला कळलं तेव्हा ‘मिड डे’शी संवाद साधताना ती म्हणाली, ‘माझ्यामते ही मी साकारलेल्या भूमिकेसाठीची पोचपावतीच आहे. मी एक सर्वसामान्य महिला आहे, जिला पुरुष आवडतात. मुळात या माध्यमातून मी ‘कुक्कू’ची भूमिका साकारण्यासाठी सक्षम आहे, हेच दाखवून दिलं. सहा वर्षांची असताना ज्यावेळी मी शाळेत एका झाडाची भूमिका साकारली होती, अगदी त्याच प्रामाणिकतेने मी कुक्कूही साकारली आहे’, असं कुब्रा म्हणाली.

वाचा : #WeWantSacredGames2 : ‘सेक्रेड गेम्स’च्या दुसऱ्या सिझनसाठी नेटकरी आतूर

‘सेक्रेड गेम्स’मध्ये कुक्कूची चांगली बाजू दाखवण्यात आल्यामुळे ही बाब अनेकांचच मनं जिंकत आहे. मुळात तिच्या वाट्याला आलेल्या व्यक्तीरेखेचा ‘सेक्रेड गेम्स’ या पुस्तकात अगदी ओझरता उल्लेख होता. पण, ती व्यक्तीरेखा साकारली जाऊ लागली असता तिची व्याप्ती निर्माते- दिग्दर्शकांच्या लक्षात आली आणि कुब्राला आणखी दृश्यंही देण्यात आली. कारण, त्यामधून खरी ‘कुक्कू’ काय होती हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचणंही तितकच महत्त्वाचं होतं, असं तिने स्पष्ट केलं होतं.

‘सेक्रेड…’मधील एका दृश्यामध्ये ‘कुक्कू’ला विवस्त्र दाखवण्यात आलं आहे. ज्या दृश्यासाठी तिच्याकडून जवळपास ७ वेळा रिटेक घ्यावे लागले होते. खुद्द कुब्रानेच ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत याविषयी सांगितलं होतं.