फेब्रुवारी महिना म्हटलं की व्हॅलेंटाइन डेचा उल्लेख ओघाने येतोच. प्रियकर किंवा प्रेयसीबद्दलचे आपले प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस. त्यामुळे तरुणाईमध्ये सळसळता उत्साह पाहायला मिळतो. याच धर्तीवर आधारित ‘वेडिंगचा शिनेमा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार ही नवोदित जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटातलं तिसरं गाणं प्रदर्शित झालं असून हे गाणं याच जोडीवर चित्रित करण्यात आलं आहे.  या चित्रपटामध्ये ऋचाने परी प्रधान ही व्यक्तीरेखा साकारली आहे,तर शिवराजने पक्याची भूमिका वठविली आहे.

प्रख्यात संगीत दिग्दर्शक डॉ सलील कुलकर्णी यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट असलेल्या ‘वेडिंगचा शिनेमा’ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाची गाणी संदीप खरे यांनी लिहिल्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. या चित्रपटातील तिसरं गाणं “माझ्या मामाच्या लग्नाला नक्की यायचं हं’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. विशेष म्हणजे हे गाणे डॉ. सलील कुलकर्णी यांच्या मुलाने शुभंकरने गायलं आहे.

पक्या शहाणे हा परी प्रधानला मागणी घालतो आणि त्यांचे लग्न ठरते. या लग्नाची लगबग सुरु होते आणि या लग्नाचं निमंत्रण पक्याचे भाचे गाणं गाऊन साऱ्यांना देतात. “माझ्या मामाच्या लग्नाला नक्की यायचं हं…कुणी जेवाल्यावाचून नाही जायचं हं….माझ्या मामाच्या लग्नाची गेली बातमी वाऱ्याला…” असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणं १४ वर्षाच्या शुभंकरने गायलं आहे. या गाण्यात त्याला आर्या आंबेकर आणि प्रसेनजीत कोसंबी यांनी साथ दिली आहे.


पारंपारिक रीतीरिवाज ते आधुनिक फॅड आणि पद्धती यांचा मिलाप हल्ली भारतीय विवाह सोहळ्यांमध्ये पाहायला मिळतो आणि तो संपूर्ण कुटुंबासाठी उत्सवी क्षणांचा मेळावा असतो. बहुचर्चित ‘वेडिंगचा शिनेमा’मध्ये हे सगळे पैलू भरपूर मनोरंजनाच्या मसाल्यासह प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या चित्रपटाचा एक टीझर नुकताच प्रदर्शित झाला होता. त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. हा चित्रपट १२ एप्रिल २०१९ रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘वेडिंगचा शिनेमा’मध्ये मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, प्रवीण तराडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हणमघर, योगिनी पोफळे या आघाडीच्या कलाकारांच्या भूमिका आहेत.