कधी काळी बॉलिवूडमध्ये सुपरहिट ठरलेल्या ‘सडक’ या चित्रपटाचा सिक्वल येणार आहे. महेश भट्ट दिग्दर्शित ‘सडक’ या चित्रपटामध्ये संजय दत्त आणि पुजा भट्ट ही जोडी पाहायला मिळाली होती. अजूनही बॉलिवूडमधल्या हिट चित्रपटात गणल्या जाणाऱ्या या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये महेश भट्ट यांची दुसरी मुलगी आलिया भट्टही दिसणार आहे. मात्र या चित्रपटात काम करण्यासाठी आलियानं महेश भट्ट यांच्यासमोर एक अट ठेवली होती.

खुद्द महेश भट्ट यांनी या सिक्वलच दिग्दर्शन केलं तरच मी या चित्रपटात काम करेन अशी अट तिनं वडिलांपुढे ठेवली आहे. या चित्रपटाची कथा महेश भट्ट यांनी आलियाला ऐकवली होती ही कथा ऐकून तिनं लगेचच होकार दिला. आलियाला इण्डस्ट्रीत येऊन बरी वर्षे उलटली आहेत मात्र वडील निर्माते- दिग्दर्शक असतानाही त्यांच्या एकाही चित्रपटात तिनं काम केलं नाही. त्यामुळे वडिलांच्यासोबत ती पहिल्यांदाच काम करणार आहे.

सिक्वलमध्ये आलियासोबत संजय दत्त, पूजा भट्ट आदित्य रॉय कपूर ही कलाकार मंडळी प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. १९९१ मध्ये ‘सडक’ प्रदर्शित झाला होता त्यानंतर तब्बल २७ वर्षांनंतर ‘सडक’चा सिक्वल येत आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं आलिया आणि पूजा भट्ट या दोघी बहिणीही पहिल्यांच स्क्रिन शेअर करणार आहेत. मार्च २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.