बारा दिवसांच्या पाहुणचारानंतर ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात बाप्पाला निरोप दिला जातोय. मात्र, बाप्पा खरंच पुढच्या वर्षी येईल का, असा प्रश्न ‘स्टार प्रवाह’नं ‘बाप्पानं दहा दिवस काय पाहिलं?’ या व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थित केलाय. या व्हिडिओची सोशल मीडियात चांगलीच चर्चा आहे.

‘स्टार प्रवाह’नं मागील वर्षी अभिनेता रितेश देशमुखसह ‘थँक गॉड बाप्पा’ हा म्युझिक व्हिडिओ केला होता. त्या व्हिडिओतून बदलत्या गणेशोत्सवातली सात्विकता संपून होणाऱ्या बाजारीकरणावर भाष्य करण्यात आलं होतं. त्या व्हिडिओला मोठा प्रतिसाद मिळाला होता. यंदा तोच विचार पुढे नेण्याचं काम ‘बाप्पानं अकरा दिवस काय पाहिलं’ हा व्हिडिओ करतो. या व्हिडिओचं वेगळेपण म्हणजे, बाप्पाच्या नजरेतून उत्सवाकडे पाहण्यात आलं आहे. त्यामुळे भक्ती ते धांगडधिंगा आणि पर्यावरणाची हानी असा प्रवास यात मांडण्यात आलाय. त्यात घरी मनोभावे आरती करणारे भाविक ते उत्सवात पत्ते खेळणे, मद्यपान करणे, डीजेवर नाचणे आणि विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी किनाऱ्यावर पडलेली मूर्ती असं सगळं चित्रण करण्यात आलंय. या व्हिडिओला चाळीस हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Ganesh Utsav 2017 : सकारात्मकतेचा अनुभव देणारा गणेशोत्सव- विनोद गायकर

उत्सवाची वेगवेगळी रूपं दाखवतानाच एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय. विसर्जनावेळी प्रत्येक गणेशभक्त ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष करत असतो. मात्र, बाप्पानं दहा दिवस हा असा उत्सव पाहिल्यानंतर खरंच पुढच्या वर्षी बाप्पा येतील का, हा प्रश्न विचार करायला लावणारा, आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे.