‘साधू आगाशे’ म्हणजे नाना पाटेकर आणि त्यांनी साकारलेला साधू म्हणजे ‘अब तक छप्पन्न’ असं सगळं एका वाक्यात सांगितलं की.. दहशतवाद्यांना आपल्या हुशारीने टिपणारा कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आठवतो. चित्रपटाच्या नावापासूनच सुरुवात होते ती एका ‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट’ची कथा म्हणून. मात्र, चित्रपट जिथे संपतो तिथे ती एका नाराज पोलीस अधिकाऱ्याची, हतबल बापाची, कर्तव्यात सर्वस्व हरवलेल्या पतीची शोकांतिका असते. शिमित अमिन दिग्दर्शित ‘अब तक छप्पन्न’ चित्रपटाने तेव्हा प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं आणि नानांचा ‘साधू आगाशे’ हा नवा नायकही दिला होता. आज दहा वर्षांनी साधू आगाशेचं पुढे काय झालं असेल?, या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न दिग्दर्शक एजाज गुलाब यांनी केला आहे.
rv10नानांचा ‘साधू आगाशे’ पुन्हा दहा वर्षांनी परततो आहे. ‘अब तक छप्पन्न २’ या नावाने साधूची पुढच्या आयुष्याची कथा प्रेक्षकांसमोर येणार आहे. मात्र, यावेळी केवळ साधू आगाशे एन्काऊंटर स्पेशालिस्ट अधिकारी म्हणून परतणार नाही. ही कथा पहिल्यापेक्षा अधिक रोमांचक आहे, असा दावा दिग्दर्शक एजाज गुलाब यांनी ‘वृत्तांत’शी बोलताना केला. एजाज गुलाब हे चित्रपटसृष्टीत स्टंट डिरेक्टर म्हणून नावाजलेलं नाव. रामगोपाल वर्माच्या ‘अग्यात’, ‘रक्तचरित्र’पासून अनेक चित्रपटांसाठी त्यांनी स्टंट डिरेक्टर म्हणून काम केलं आहे. ‘स्टंट डिरेक्टर’ म्हणून कित्येक चित्रपट नावावर असले तरी याच माणसाची सुरुवात सलमान, आमिरसारख्या नायकांसाठी स्टंट करताना ‘बॉडी डबल’ म्हणून झाली होती. रामगोपाल वर्माबरोबरच चित्रपट करत असताना ‘अब तक छप्पन्न’च्या सिक्वलची योजना पुढे आली होती. त्यावेळी स्टंट दिग्दर्शनातली माझी मास्टरी या चित्रपटाच्या सिक्वलसाठी उपयोगी ठरेलच. पण, माझ्याकडून या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी काही एक वेगळा विचार मिळू शकतो, असा विश्वास त्यांना वाटला. आणि सिक्वलची जबाबदारी माझ्याकडे आली, अशी आठवण एजाज यांनी सांगितली. स्टंट दिग्दर्शक ते चित्रपट दिग्दर्शक हा प्रवास ‘अब तक छप्पन्न’सारख्या गाजलेल्या चित्रपटाने करणं ही आनंदाची गोष्ट असली तरी तितकीच आव्हानात्मक होती, असं ते सांगतात.
मुळात, शिमितने दिग्दर्शित केलेली साधूची कथा लोकांच्या मनात चांगलीच घर करून आहे. त्यामुळे सिक्वलमध्ये साधूच्या व्यक्तिरेखेला तितक्याच जोरदारपणे पुढे नेणं हे पटकथेच्या स्तरावरचं मोठं आव्हान होतं आणि खरं सांगायचं तर ‘साधू आगाशेचं पुढे काय झालं’ या एकाच वाक्यावरून सिक्वलची कथा सुरू झाली आहे, असं एजाज म्हणतात. मी स्वत: साधू आगाशेचा चाहता होतो. साधू आगाशेसारखा एक प्रतिभावान, सामथ्र्यशाली पोलीस अधिकारी जो दहा वर्षे नाराज होऊन दूर राहिला आहे. तो जेव्हा सेवेत पुन्हा परततो तेव्हा त्याच्याबरोबर काम करणारे अधिकारी, ज्या माफियांना त्याने नेस्तनाबूत केलं होतं त्यांची मानसिकता, जुने मित्र आणि नातेवाईकांबरोबरचे नवे संबंध या सगळ्या गोष्टींमध्ये ‘साधू आगाशे’च्या परतण्याने नवं काहीतरी घडणार आहे. असा पोलीस अधिकारी प्रत्यक्षातसुद्धा केवळ तणावाची परिस्थिती नियंत्रण करण्यात अनुभवी राहत नाही. तो एकाच वेळी कामावरचा दबाव, कुटुंबियांची मानसिकता आणि राजकीय दबावही तितक्याच हुशारीने सांभाळू शकतो. ‘अब तक छप्पन्न २’मध्ये साधू आगाशेचे हे असे अनेक कंगोरे दाखवण्यावर आपण भर दिला असल्याचे एजाज यांनी सांगितलं. पहिल्याच दिग्दर्शकीय चित्रपटात नाना पाटेकर, मोहन आगाशे, विक्रम गोखले यांच्यासारख्या कसलेल्या कलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभवही तितकाच खासा होता, असं ते म्हणतात.
नाना पाटेकरांसारखा कलाकार रागीट, आक्रमक स्वभावाचा आहे, असं कित्येकांनी सांगितलं होतं. मात्र, या चित्रपटाची जानच हा कलाकार आहे. नाना म्हणजेच साधू आणि म्हणूनच तो चित्रपट हे वास्तव होतं. त्यामुळे त्यांना कथा ऐकवतानाच धडधड होत होती. पण, साधूची पुढची कथाच त्यांना पसंत पडली आणि चांगली सुरुवात झाली. मात्र, माझी कथा, माझी टीम पूर्ण तयारीनिशी चित्रीकरण करत होती. ज्यामुळे त्यांच्यापैकी एकानेही आमच्यावर नाराजी व्यक्त केली नाही. उलट, नानांशी चर्चा करत खेळीमेळीने चित्रीकरण पार पडलं, असा आपला अनुभवही एजाज यांनी सांगितला. ‘अब तक छप्पन्न’ जिथे संपला अगदी त्या क्षणापासून सिक्वलची सुरुवात झाली आहे. दहा वर्षांनंतर मोहन आगाशे हे सेवेतून निवृत्त झाले आहेत. साधूचा मुलगा आता मोठा झाला आहे आणि त्याच्याच हट्टावरून साधू पुन्हा सेवेत परतणार आहे. तुम्ही ज्या कामासाठी चपखल होतात तेच काम तुम्हाला परत येऊन केलं पाहिजे, या मुलाच्या हट्टावरून दहा वर्षांची नाराजी बाजूला ठेवत पोलिसी सेवेत परतलेला साधू आगाशे पुढे काय करणार याची कथा म्हणजे ‘अब तक छप्पन्न २’ चा हा सिक्वल आहे. नाना पाटेकर यांना यावेळी आणखी अ‍ॅक्शन रूपात पाहण्याची संधीही या सिक्वलच्या निमित्ताने प्रेक्षकांना मिळणार आहे. या चित्रपटानंतर पुन्हा एकदा नाना आणि सलमान खान अशा दोन ताकदीच्या कलाकारांना एकत्र आणत एक चित्रपट करायचा मानस एजाज यांनी व्यक्त केला. त्यासाठी पटकथाही पूर्ण झाली आहे मात्र, सध्या लक्ष ‘अब तक छप्पन्न २’वरच केंद्रित झालं आहे हे सांगायलाही ते विसरत नाहीत.

former Vice President M Venkaiah Naidu criticises freebies trend
पक्ष बदलला की जुन्या नेत्यांना शिव्या देणं चुकीचं: माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंची टीका
Abhishek Ghosalkar, murder,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाच्या दृष्टीने तपास केला का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा
shares market, stock prices
तेजीला पूर्णविराम की स्वल्पविराम?
narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?