आयुष्य म्हणजे बऱ्यावाईट अनुभवांचं एक गाठोडंच असतं. त्यात अनेकांच्या वाट्याला येणारं सुखदु:खाचं प्रमाणही कमी जास्त असंच असतं. काहींच्या वाट्याला दु:ख जास्त, तर काहींच्या वाट्याला सुख जास्त असतं. अभिनेता संजय दत्तच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं होतं. एक अभिनेता, सेलिब्रिटी म्हणून संजूबाबाची वेगळी ओळख आहे. पण, एक व्यक्ती म्हणून त्याच्या आयुष्याच्या प्रवासात बरेच अडथळे आले असून कठिण प्रसंगांचा त्यानेही सामना केल्याचं सर्वांनाच ठाऊक आहे. संजयच्या आयुष्यातील अशाच काही प्रसंगांवर यासिर उस्मान यांनी उजेड टाकला आहे. त्याच्या आयुष्यातील संघर्षाचा काळ, त्याच्यावर करण्यात आलेले आरोप आणि अडचणीची परिस्थिती या साऱ्याविषयीच ‘संजय दत्त: द क्रेझी अनटोल्ड स्टोरी ऑफ बॉलिवूड्स बॅड बॉय’ या पुस्तकातून भाष्य करण्यात आलं आहे.

उस्मान यांच्या या पुस्तकाच्या माध्यमातून संजय दत्तच्या आयुष्याविषयीच्या काही गोष्टींचा उलगडा सर्वांसमोर होणार आहे. यातीलच एक भावनिक प्रसंग सध्या बराच चर्चेत आला आहे. ज्यामध्ये संजय दत्तच्या आईच्या म्हणजेच अभिनेत्री नर्गिस यांच्या निधनाच्या वेळचं कथन करण्यात आलं आहे. ३ मे १९८३ ला कर्करोगामुळे नर्गिस यांचं निधन झालं होतं. त्यावेळी संजय अजिबातच रडला नव्हता. ‘रॉकी’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याच्यावर हा आघात झाला होता. जवळपास तीन वर्षे संजयने त्याच्या भावना अडवून धरल्या होत्या. पण, तीन वर्षांनंतर ज्यावेळी रेकॉर्ड केलेल्या टेपच्या माध्यमातून संजयने त्याच्या आईचा आवाज ऐकला तेव्हा मात्र त्याच्या भावना अनावर झाल्या आणि तो ढसाढसा रडला.

या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे, ‘आईच्या निधनानंतर साधारण तीन वर्षांनी संजय अमेरिकेतील व्यसनमुक्ती केंद्रात गेला. त्यावेळी संजयवर उपचार सुरु असताना त्याच्या वडिलांनी म्हणजेच अभिनेता सुनील दत्त यांनी नर्गिस यांच्या अखेरच्या दिवसांमध्ये रेकॉर्ड केलेल्या काही कॅसेट पाठवल्या. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या या टेपमध्ये नेमकं आहे काय, हे खुद्द संजयलाही ठाऊक नव्हतं. पण, ज्यावेळी ती टेप सुरु झाली तेव्हा त्या खोलीत नर्गिस यांचाच आवाज होता.’

पाहा : Video: अखेरच्या चेंडूवर षटकार खेचत कार्तिक ठरला हिरो, तो क्षण पुन्हा एकदा अनुभवायचा आहे??

हा अनुभव वाचतेवेळी अनेकांच्याच अंगावर काटा उभा राहतोय. पुढे या पुस्तकात लिहिलंय, ‘आईचा आवाज ऐकल्यानंतर संजयच्या डोळ्यासमोर त्याचं बालपण उभं राहिलं. आईच्या आवाजात आजारपणामुळे आलेला अशक्तपणा स्पष्टपणे जाणवत होता. पण, त्यातही नर्गिस आपल्या मुलाच्या स्वप्नांविषयीच बोलत होत्या, त्याला सल्ले देत होत्या. आईचं हे बोलणं ऐकून तिचं आपल्यावर किती प्रेम होतं, याचीच अनुभूती संजयला झाली आणि त्या क्षणाला भावनांना आवर घालणं त्याच्यासाठी कठिण होऊन बसलं. तो रडू आवरु शकला नाही. जवळपास चार दिवस तो रडतच होता.

‘कोणत्याही गोष्टीला महत्त्व देण्याआधी संजू तुझ्यातील माणूसकी जप. चरित्र जप. कधीही कोणत्याच गोष्टीत गर्विष्ठपणा दाखवू नकोस. समंजसपणे वाग, मोठ्यांचा आदर कर. कारण याच गोष्टी तुला पुढे नेणार असून काम करण्यासाठी याच गोष्टी तुला प्रोत्साहन देत राहतील’, असं नर्गिस त्या रेकॉर्डमध्ये म्हणाल्या होत्या.