व्यावसायिक चित्रपटात काम न करता ज्या चित्रपटांचं कथानक दमदार असेल अशा चित्रपटांत काम करून आपली स्वतंत्र ओळख बनवलेला अभिनेता म्हणजे इरफान खान. काही दिवसांपूर्वीच इरफानने जगाचा निरोप घेतला. एक सच्चा कलाकार गमावल्याची भावना सबंध चित्रपटसृष्टीतून आणि सर्वसामान्यांमधून व्यक्त झाली. त्याचे काही जुने व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. एका पुरस्कार सोहळ्यातला इरफानचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सोहळ्याचं सूत्रसंचालन शाहरुख खान करत होता आणि प्रेक्षकांमध्ये बसलेल्या इरफानने नाराज होऊन सोहळ्याबाहेर पडण्याची तयारी केली होती.

एकीकडे शाहरुखच्या चित्रपटांना पुरस्कार मिळत असताना चिडलेल्या इरफानने पुरस्कार सोहळ्यातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र शाहरुखने त्याला अडवलं आणि त्यामागचं कारण विचारलं. तेव्हा व्यावसायिक चित्रपटांना टोमणा मारत इरफान मंचावर जातो. “तुमच्या चित्रपटांमध्ये मसाला खूप असतो, त्यांना अनेक पुरस्कार मिळतात. मग आमच्या चित्रपटांना झुकतं माप का”, असा प्रश्न तो शाहरुखला विचारतो. शाहरुख त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असतो. त्यावर इरफान एक व्हिडीओ सोहळ्यात दाखवण्याची विनंती करतो. या व्हिडीओत शाहरुखच्या ‘मोहब्बतें’ चित्रपटातील दृश्य इरफान साकारताना दिसतो. मात्र त्याला ते फारसं जमत नाही. त्यानंतर शाहरुख इरफानच्या ‘पिकू’ चित्रपटातून भूमिका साकारण्याचा प्रयत्न करतो, मात्र त्यालाही ते जमत नाही. अशा वेळी, तू तुझ्या व्यावसायिक चित्रपटांमध्येच ठीक आहेस आणि मी माझ्या चित्रपटांमध्ये ठीक असं म्हणत, दोघंही एकमेकांना समजून घेतात.

आणखी वाचा : ..तर ‘राजा हिंदुस्तानी’ ऐश्वर्याचा पहिला चित्रपट ठरला असता

२९ एप्रिल रोजी इरफानचे मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. कॅन्सरशी त्याचा लढा अपयशी ठरला. इरफानच्या निधनानंतर संपूर्ण सिनेसृष्टी व जनसामान्यांतून शोक व्यक्त झाला.