सोलापूर : ‘सैराट’ फेम ‘आर्ची’ अर्थात रिंकू राजगुरू ही गुरुवारी बारावी परीक्षा देण्यासाठी टेंभुर्णी येथील परीक्षा केंद्रावर आली. त्या वेळी तिला पाहण्यासाठी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. या गर्दीतून वाट काढत सुरक्षाव्यवस्थेत ‘आर्ची’ला परीक्षा केंद्रात यावे लागले.
नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटातील आर्चीच्या प्रमुख भूमिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अकलूजची रिंकू ऊर्फ प्रेरणा महादेव राजगुरू हिने चित्रपटसृष्टीतील कामांचा व्याप सांभाळत बारावी परीक्षा देण्याचे ठरवले होते. त्यासाठी तिने टेंभुर्णी येथील जय तुळजाभवानी कला व शास्त्र कनिष्ठ आश्रम महाविद्यालयातून बहिस्थ विद्यार्थी म्हणून आवेदनपत्र दाखल केले होते. कला शाखेतून शिक्षण पूर्ण करीत असताना गुरुवारपासून सुरू झालेल्या बारावी परीक्षेला ती सामोरी गेली. तिच्याभोवती असलेले प्रसिद्धीचे वलय पाहता परीक्षा केंद्रावर तिला पाहण्यासाठी गर्दी होणार तसेच इतर परीक्षार्थीनाही त्याचा त्रास होणार, हे गृहीत धरून परीक्षा केंद्र संचालकांनी जादा पोलीस सुरक्षा उपलब्ध होण्यासाठी पोलीस प्रशासनाला कळवले होते. त्यानुसार टेंभुर्णीत जादा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सकाळी ठरल्याप्रमाणे परीक्षेचा पहिला पेपर सुरू होण्यापूर्वी सुरक्षाव्यवस्थेत ‘आर्ची’ दाखल झाली. चारचाकी मोटारीतून ती उतरताच तिला प्रत्यक्ष पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी वाढली. या गर्दीतून वाट काढत तसेच प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींचा पिच्छा सोडवत आर्ची परीक्षा केंद्रात गेली. जाताने तिने इतर सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळण्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. परीक्षा केंद्रातील संचालकांसह इतरांनी तिचे स्वागत केले.