‘माव्‍‌र्हल’चा अगामी सुपरहिरोपट ‘डेडपूल-२’चा आणखी एक नविन ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरच्या हिंदी आवृत्तीमध्ये बॉलिवुड स्टार रणवीर सिंगने आवाज दिल्यामुळे ‘डेडपूल’बाबत आता भारतीयांनाही उत्सूकता लागली आहे. परंतु, या ट्रेलरमध्ये ‘डेडपूल’पेक्षा जास्त लक्ष ‘केबल’ने वेधून घेतले आहे. तो या चित्रपटातील मुख्य खलनायक आहे. ज्याप्रमाणे ‘आयर्न मॅन’ हा अ‍ॅव्हेंजर्समधील सर्वात आघाडीचा सुपरहिरो आहे. त्याचप्रमाणे वूल्वरिनच्या निवृत्तीनंतर आता ‘डेडपूल’ हा एक्समेनमधील सर्वात महत्वाचा सुपरहिरो आहे. ‘आयर्न मॅन’ व ‘वूल्वरिन’ हे इतर माव्‍‌र्हल सुपरहिरोंच्या तुलनेने अधिक लोकप्रिय झाले कारण त्यांनी त्यांच्यापेक्षा अधिक शक्तिशाली खलनायकांचा सामना केला होता. आणि हेच सूत्र लक्षात घेऊन ‘डेडपूल-२’मध्ये आता खलनायक ‘केबल’चा समावेश करण्यात आला आहे.

‘केबल’ हा कॉमिक सिरीजमध्ये ‘डेडपूल’चा सहकारी असला तरी चित्रपटात मात्र तो मुख्य खलनायकाची भूमिका साकारणार आहे. गमतीशीर बाब म्हणजे नुकताच सुपरहिट झालेल्या ‘अ‍ॅव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर’मधील मुख्य खलनायक थेनॉसची भूमिका साकारणारा जोश ब्रोलीन हाच केबलची व्यक्तिरेखा साकारणार आहे. केबल हा अर्धा मानव आणि अर्धा रोबोट म्हणजेच ‘सायबॉर्ग’ आहे. तो एका लहान मुलाला मारण्यासाठी भविष्यातून २००० हजार वर्ष मागे पृथ्वीवर आला आहे. त्याची जन्मकथा ही ‘एक्समेन’ मालिकेतील आजवरची सर्वात गुंतागुंतीची कथा आहे. पण ढोबळमानाने वर्णन करायचे झाल्यास तो ‘एक्समेन’ चित्रपटमालिकेतील ‘सायक्लॉप्स’चा मुलगा आहे. काही कारणास्तव त्याला भूतकाळातून भविष्यात पाठवण्यात आले आहे. आणि या चित्रपटात तो भविष्यातून पुन्हा एकदा भूतकाळात येणार आहे.

‘वूल्वरिन’च्या निवृत्तीनंतर ‘एक्समेन’ मालिकेचा शेवट झाला अशी चर्चा होती, परंतु ‘डेडपूल’मध्ये केबलचा समावेश करून पुन्हा एकदा नविन सुपरहिरोंबरोबर ‘एक्समेन’ची सुरुवात करण्यात येत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. केबल भविष्यातून आल्यामुळे त्याच्याकडे ‘डेडपूल’च्या तुलनेने अधिक प्रगत तंत्रज्ञान व हत्यारे आहेत. त्यामुळे अशा शक्तिशाली खलनायकाचा सामना आता तो कसा करणार हे नक्कीच पाहण्याजोगे ठरेल.