23 July 2019

News Flash

‘मी बिकीनी घालावी की नाही हे सांगणारा सैफ कोण?’, करिना संतापली

"मी बिकीनी घालत असेल तर..."

करिना संतापली

अभिनेता सैफ अली खान आणि त्याची पत्नी करिना कपूर सतत या ना त्या कारणाने चर्चेत असतात. दोघेही जण सध्या आपल्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहेत. तरी ते एकमेकांना बराच वेळ देताना दिसतात. अनेकदा विमानतळावर किंवा एखाद्या हॉटेलबाहेर या दोघांना मुलगा तैमुरबरोबर कॅमेरामन्सने टिपले आहे. सैफ हा एक चांगला नवरा असल्याचे करिनाने अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे. सैफने माझ्यावर कोणतीही बंधने घातलेली नाहीत. मला माझ्या आवडी निवडींचे पूर्ण स्वातंत्र्य आहे असं करिना अनेक कार्यक्रमांमध्ये म्हणाली आहे. ‘वीरे दी वेडिंग’ सिनेमाच्या आधी आई झालेल्या करिनाला सिनेमातील भूमिकासाठी वजन कमी करायला सैफनेच प्रोत्साहन दिल्याचे करिनाने स्पष्ट केले. एकंदरित सैफ हा परफेक्ट नवरा असल्याचे करिनाचे म्हणणे आहे. असे असले तरी अनेकांना सैफ करिनावर बंधने टाकत असल्याचे वाटते खास करुन तिने कोणती कपडे घालावीत याबद्दल सैफ खूपच पझेसिव्ह असल्याचे अनेकांना वाटते असं नुकत्याच एका चॅट शोमध्ये दिसून आले. मात्र सैफबद्दल शंका उपस्थित करणाऱ्यांना करिनाने चांगलेच उत्तर दिले आहे.

अभिनेता अरबाज खानच्या क्विक हिल पिंच या नव्या चॅट शोमध्ये करिना सहभागी झाली होती. या कार्यक्रमामध्ये करिनाला तिच्या फोटोंवरील काही कमेन्ट्स वाचून दाखवण्यात आल्या. या कमेन्टसमधून अनेकांनी करिनाला टार्गेट करत तिच्या कपड्यांसंदर्भात टिप्पणी केली होती. यापैकी एका कमेन्टवर करिना चांगलीच संतापली. या कमेन्टमध्ये ‘सैफ तुझी बायको बिकीनी घालते याची तुला लाज वाटत नाही का?’ असा सवाल केला होता. अरबाजने ही कमेन्ट वाचून दाखवल्यानंतर लगेचेच करिनाने यावर आपले मत व्यक्त केले. ‘मी बिकीनी घालावी की नाही हे सांगणार सैफ कोण? सैफ आणि माझे नाते असे नाही आहे, ज्यात तो मला कधी तू ही बिकीनी का घातली किंवा तू असं का केलं असा प्रश्न विचारेल. आमचे नाते खूप प्रगल्भ आहे. त्याचा माझ्यावर विश्वास आहे. आणि जर मी बिकीनी घालत असेल तर त्यामागे काहीतरी कारण असणार,’ असं मत करिनाने नोंदवलं आहे.

याच मुलाखतीमध्ये सोशल नेटवर्किंगवरील कमेन्टचा त्रास होतो असं सांगताना चाहत्यांनी कलाकारांना भावनिक दृष्ट्या ग्राह्य धरणे चुकीचे असल्याचे मत करिनाने व्यक्त केले आहे. आम्हालाही हृद्य आहे. आम्हालाही भावना आहेत हे चाहत्यांनी लक्षात घ्यायला हवं, असं मत करिनाने सोशल नेटवर्किंगवरील कमेन्टसबद्दल बोलताना मांडले. तुम्ही एखाद्याला व्यक्तिगतरित्या ओळखत नसाल तर त्यांच्याबद्दल सोशल नेटवर्किंगवर कमेन्ट करणे चुकीचे आहे असं करिना या मुलाखतीमध्ये म्हणाली.

First Published on March 13, 2019 3:35 pm

Web Title: who is saif ali khan to stop me from wearing a bikini kareena kapoor khan