X

‘मनमर्जियां’ पाहिल्यानंतर बिग बींनी का टाळलं अभिषेक बच्चनशी बोलणं?

अभिषेक बच्चन जवळपास दोन वर्षांनंतर 'मनमर्जियां' या चित्रपटातून पुनरागमन करत आहे.

अभिषेक बच्चन जवळपास दोन वर्षांनंतर ‘मनमर्जियां’ या चित्रपटातून पुनरागमन करत आहे. येत्या शुक्रवारी म्हणजेच १४ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. अभिषेक, तापसी पन्नू आणि विकी कौशल यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाची बिग बींसाठी विशेष खासगी स्क्रिनिंग ठेवण्यात आली होती. यावेळी बिग बींची मुलगी श्वेता बच्चन नंदासुद्धा त्यांच्यासोबत होती. आपल्या मुलाचा चित्रपट पाहिल्यानंतर अमिताभ बच्चन काय प्रतिक्रिया देतील हे जाणून घेण्यासाठी सर्वच जण उत्सुक आहेत.

सोमवारी ‘मनमर्जियां’च्या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावल्यानंतर बिग बी काय प्रतिक्रिया देतील हे जाणून घेण्यासाठी अभिषेकसुद्धा उत्सुक आहे. दोन वर्षांनंतर एका अनोख्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आलेल्या अभिषेकसाठी हा चित्रपट खूप महत्त्वाचा आहे. ‘रॉबी’ असं त्याच्या भूमिकेचं नाव असून प्रेमाचा त्रिकोण या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. स्क्रिनिंगनंतर जेव्हा अभिषेकने वडिलांना त्यांची प्रतिक्रिया विचारली तेव्हा, ‘तुझ्याशी नंतर बोलतो’ इतकंच ते म्हणाले. ते असं का म्हणाले आणि चित्रपटावर प्रतिक्रिया देणं त्यांन का टाळलं हा प्रश्न अभिषेकसोबतच अनेकांनाच पडला आहे.

दुसऱ्या दिवशी बिग बींनी या चित्रपटातील इतर कलाकार म्हणजेच तापसी आणि विकीच्या घरी पुष्पगुच्छ पाठवला आणि त्यांच्या अभिनयकौशल्याचं कौतुक केलं. पण अभिषेकसाठी मात्र त्यांनी अद्याप काहीच प्रतिक्रिया दिली नाही. अभिषेक सध्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी कॅनडामध्ये आहे. दरम्यान अमिताभ बच्चन यांनी स्क्रिनिंगच्या दिवशी केलेलं एक ट्विट याविषयी लक्ष वेधत आहे. ‘जेव्हा तुम्ही भावनांनी ओथंबून जाता, तेव्हा बोलण्यासाठी किंवा व्यक्त होण्यासाठी तुम्हाला शब्द सुचत नाहीत. मी सध्या अशाच परिस्थितीत आहे आणि असं का होतं हे लवकरच समजेल,’ असं त्यांनी ट्विट केलं. त्यामुळे कदाचित चित्रपट पाहिल्यानंतर गहिवरून आल्याने बिग बींनी अभिषेकला कोणतीच प्रतिक्रिया दिली नसावी असं म्हटलं जात आहे. तेव्हा आता यावर बिग बी काय म्हणतील याकडे सर्वांचंच लक्ष आहे.