कर्नाटकमधल्या राजकीय घडामोडींकडे शनिवारी सर्वांचंच लक्ष लागून राहिलं होतं. निर्णायक बहुमत नसताना राज्यपालांच्या विशेषाधिकाराच्या जोरावर कर्नाटकची सत्त काबीज करण्याचे दु:साहस भाजपच्या चांगलंच अंगलट आलं. या संपूर्ण राजकीय नाट्यादरम्यान एक अभिनेत्री गुगलवर ट्रेण्ड होत होती. गुगलवर सर्वाधिक सर्च त्या अभिनेत्रीविषयी केलं जात होतं. आता अभिनेत्री आणि कर्नाटकमधल्या राजकारणाचा काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना? तर जेडीएसचे नेते आणि कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांची पत्नी पत्नी राधिका कुमारस्वामीला गुगलवर मोठ्या प्रमाणात सर्च केलं जात आहे.

कुमारस्वामी मुख्यमंत्री म्हणून लवकरच शपथ घेणार आहेत. तर त्यांची पत्नी राधिका कुमारस्वामी कन्नड चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्माती आहे. २००६ मध्ये या दोघांचं लग्न झालं असून त्यांना एक मुलगी आहे.

राधिका तिच्या चित्रपटांपेक्षा नातेसंबंधांमुळे अधिक चर्चेत राहिली आहे. २००० साली राधिकाने रतन कुमारसोबत गुपचूप लग्न केलं होतं. त्यानंतर रतन कुमारने राधिकाच्या वडिलांविरोधात पोलिसांत तिला पळवून घेऊन गेल्याची तक्रार नोंदवली होती. त्यानंतर राधिकाची आई समोर येत माझ्या मुलीला आमिष दाखवून तिच्याशी लग्न केल्याचा आरोप रतन कुमारवर केला. त्यावेळी राधिका फक्त १४ वर्षांची होती असा खुलासाही त्यांनी केला होता.

२०१० मध्ये स्वत: राधिकाने सर्वांसमोर येत खुलासा केला की, २००६ मध्येच जेडीएस नेते एच.डी.कुमारस्वामी यांच्याशी लग्न केलं. सध्या देशभरात कर्नाटकमधल्या राजकीय नाट्याची चर्चा होत असतानाचा पुन्हा एकदा राधिका चर्चेत आली आहे. राधिकाविषयी गुगलवर सर्वाधिक सर्च केले जात असल्याने ती ट्रेण्डमध्ये आहे.

राधिकाने २००२ मध्ये ‘नीला मेघा शमा’ या कन्नड चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. राधिकाने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत जवळपास ३२ चित्रपटांमध्ये काम केलं. कन्नड चित्रपटांव्यतिरिक्त काही तामिळ चित्रपटांमध्येही तिने भूमिका साकारली.