प्रयोगशील अभिनेत्री म्हणून तापसी पन्नू हिला सिनेसृष्टीत ओळखलं जातं. ती आपल्या प्रत्येक चित्रपटात नव्या धाटणीची व्यक्तिरेखा साकारण्याचा प्रयत्न करत असते. असाच एक नवी मांडणी करणाऱ्या चित्रपटातून तापसी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तिच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘थप्पड’ असं आहे. नेहमी घडणाऱ्या पण कधीही लक्षात न येणाऱ्या कौटुंबिक हिंसाचारावर या चित्रपटातून भाष्य करण्यात आलं आहे.

‘थप्पड’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. स्त्रियांवर होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचारावर आधारित हा चित्रपट आहे. सर्वसाधारणपणे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याचा जनमानसावर प्रभाव पडतो. सकारात्मक घटना घडतात. पंरतु ‘थप्पड’ या चित्रपटाच्या ट्रेलरनेच एका महिलेवर प्रभाव टाकला आहे. सिनेमाचा तीन मिनिटांचा ट्रेलर पाहून एका महिलेला तिच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव झाली. याविरोधात तिनं भूमिका घेण्याचं ठरवलं असून, अत्याचार करणाऱ्या आपल्या पती विरोधात पोलीस तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.

महिलेचं म्हणणं काय?

या महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील महिला पतीविरोधात तक्रार करत आहे. तो तिला मारहाण करतो, असा दावा तिने केला आहे. तापसी पन्नूच्या ‘थप्पड’ या चित्रपटाचा ट्रेलर पाहून ती जागृत झाली आणि आता ती पतीविरोधात पोलीस तक्रार करणार आहे. या व्हिडीओला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. काही तासात शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तिच्या धाडसाबद्दल तिचे कौतुकही केले आहे.

काय आहे ‘थप्पड’च्या ट्रेलरमध्ये?

जवळपास तीन मिनिटांच्या या ट्रेलरमधून साध्यासोप्या वाटणाऱ्या मुद्द्याची गंभीरता सहज लक्षात येते. पतीने पत्नीला फक्त कानाखाली मारल्याचीच चित्रपटाची गोष्ट आहे पण… हा ट्रेलर ‘फक्त कानाखालीच मारली ना’ असं म्हणत अगदी सहजतेने या विषयाकडे बघणाऱ्यांना चपराक लगावणारा आहे. ‘मुल्क’, ‘आर्टिकल १५’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी ‘थप्पड’चे दिग्दर्शन केले आहे. एकमेकांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या दाम्पत्यामध्ये ‘थप्पड’चा विषय काय वळण घेऊन येतो हे याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. त्यातील संवादसुद्धा मनाला भिडतात.