ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचे वयाच्या ६३ व्या वर्षी दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर दिग्गज अभिनेते अशोक सराफ भावूक झाले होते. चांगला मित्र गमावल्याचे आधिक दु:ख झाल्याची प्रतिक्रिया प्रसार माध्यमांशी बोलाताना अशोक सराफ यांनी दिली. यावेळी त्यांचे अश्रू अनावर झाले होते.

चित्रपटसृष्टीने एक चांगला अभिनेता गमावला असेल पण मी माझा एक चांगला मित्र गमावल्याचे आधिक दु:ख आहे. आम्ही नाटकांमध्ये एकत्र काम केले नाही. मात्र अनेक चित्रपटांमध्ये एकत्र अभिनय केला आहे. अभिनय करण्याची त्यांची एक वेगळी शैली होती. कोणत्याही भूमिकेत चपखल बसत होते.  आजच्या नव्या कलाकरांनी त्यांच्याकडून हे कौशल्य शिकायला हवे.   विजय चव्हाण यांनी स्वत:च्या कर्तुत्वावर मराठी चित्रपटसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवला होता. विजय चव्हाण यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीत एक मोठी पोकळी झाली आहे.

मोरुची मावशी या नाटकात त्यांनी अतिशय ताकदीने स्त्री पात्र रंगवले होते. मोरुची मावशी हे पात्र विशेष लक्षात राहते. मोरुची मावशी हे पात्र विजय चव्हाण यांनी अजरामर केले. त्यांच्या चित्रपट, नाटकांतील अनेक भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. मराठी चित्रपटसृष्टीने एक गुणी अभिनेता गमावलाय. पण त्यापेक्षा अधिक मला माझ्या मित्राला गमावल्याचे दु:ख होत आहे. अशी प्रतिक्रिया दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांनी दिली.

अभिनेते विजय चव्हाण यांचं शुक्रवारी  दीर्घ आजाराने निधन झालं. मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अस्वस्थ वाटू लागल्याने बुधवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या कित्येक दिवसांपासून ते आजारी होते. राज्य सरकारतर्फे दिला जाणारा ‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव’ पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. विजय चव्हाण गेली ४० वर्षे चित्रपटसृष्टीत कार्यरत होते.  विजय चव्हाण यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात रंगभूमीवरुन केली. पुढे अनेक चित्रपट आणि मालिकाही केल्या. विनोदी अभिनेता म्हणून त्यांना अवघे मराठी रसिक ओळखतातच, मात्र त्याचसोबत त्यांच्या गंभीर भूमिकाही गाजल्या. विनोदाचं उत्तम टायमिंग विजय चव्हाण यांना होतं.