लॉकडाउनमुळे घरी अजुन किती दिवस घालवावे लागतील हे अद्याप सांगता येत नाही. त्यामुळेच या कठीण काळात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा ध्यास झी टॉकीजने मनाशी बांधला आहे. २४ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट दरम्यान झी टॉकीजने ‘या रे या सारे या’ या नव्या चित्रपट महोत्सवाचे आयोजन प्रेक्षकांसाठी केले आहे. सहकुटुंब बघता येतील असे हे सुपरहिट चित्रपटप्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
या चित्रपट महोत्सवाची सुरुवात नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटाने होणार आहे. यानंतर २५ ऑगस्टला ‘पाहिली शेर दुसरी सव्वा शेर नवरा पावशेर’हा विनोदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. खोडकर-खट्याळ आदिनाथचा ‘माझा छकुला’ २६ ऑगस्ट रोजी दाखवण्यात येणार आहे. सचिन व सुप्रिया या आपल्या सर्वांच्या लाडक्या जोडीचा ‘नवरा माझा नवसाचा’ हा चित्रपट २७ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आधारित असणारा २०१८ सालचा सुपरहिट चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’ २८ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मोहन जोशी,महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, ओम भुतकर या कलाकारांनी या सिनेमा मध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपट महोत्सवाचा शेवट ‘गाढवाचं लग्न’ या चित्रपटाने होणार आहे. सावळ्या कुंभार जो इंद्राला भेटायला स्वर्गात जातो आणि तिथे जाऊन तो काय काय गम्मत जम्मत करतो हे आपल्याला या चित्रपटात बघायला मिळणार आहे. मकरंद अनासपुरे यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारलेली आहे.