टेलिव्हिजनवरील लाडका मुलगा नैतिक म्हणजे करण मेहरा आणि त्याची पत्नी निशा रावल यांना पुत्ररत्न झाला आहे. हे त्यांचे पहिलेच बाळ आहे. करणने बुधवारी रात्री इन्स्टाग्रामवरून त्याच्या चाहत्यांना ही बातमी दिली. तसेच, त्याने आपल्या नवजात बाळाचा फोटोही शेअर केला. यात त्याच्या मुलाचे चिमुकले पाय दिसतात. त्यावर एक भावनिक संदेशही त्याने लिहिला आहे. ‘या चिमुकल्या पायांनी आमच्या हृदयावर खूप मोठी छाप पाडली आहे. या आनंदाचे शब्दात वर्णन करणं कठीण आहे. या सुंदर मुलाच्या आगमनानंतर आम्ही नव्या प्रवासासाठी सज्ज झालो आहोत.’

करण आणि निशा टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध जोडी असून, त्यांच्या लग्नाला पाच वर्षे झाली आहेत. सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. करण गेल्यावर्षी बिग बॉसच्या दहाव्या सिझनमध्ये सहभागी झाला होता. त्यावेळीच निशाने त्यांना बाळ होणार असल्याचे त्याला सांगितले. ‘ये रिश्ता क्या केहलाता है’ मालिकेतील ‘नैतिक’च्या भूमिकेने करणला प्रसिद्धी मिळवून दिली होती. मात्र, आता तो या मालिकेत काम करत नाही.

वाचा : भाचा तैमुरचा फोटो बघून मामा रणबीर म्हणतो, ‘कोण आहे हा?’

या जोडीने त्यांना बाळ होणार असल्याची बातमी सर्वांना सांगण्यापूर्वीच एक विचित्र चर्चा माध्यमांमध्ये रंगली होती. निशाला बाळ झाले असून, ते लोकांपासून ही बातमी लपवत असल्याची तेव्हा चर्चा होती. निशाने या सर्व बातम्या तेव्हा धुडकावून लावल्या होत्या. अखेर, ऑक्टोबर महिन्यात निशा खरोखरच गरोदर असल्याचं समोर आलं.

गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक टिव्ही कलाकारांच्या घरी पाळणे हलल्याचे पाहायला मिळाले. नोव्हेंबर महिन्यात श्वेता तिवारीने तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला. अभिनव कोहली या दुसऱ्या पतीपासून तिला रेयांश हा मुलगा आहे.

वाचा : स्वतःवरचेच व्हायरल जोक्स जेव्हा रिंकू वाचते…

अभिनेता करणवीर वोहरा आणि त्याची पत्नी टीजे सिंधू यांनी ऑक्टोबर महिन्यात जुळ्या मुलींना जन्म दिला. व्हिएन्ना आणि राया बेल्ला अशी त्यांच्या मुलींची नावे आहेत. अभिनेता यश टोन्क फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्यांदा बाबा झाला. त्याची पत्नी आणि अभिनेत्री गौरीने गोंडस मुलीला जन्म दिला असून तिचे नाव मायरा असे ठेवण्यात आले आहे. यश आणि गौरीला याआधी एक मुलगी आहे.