दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या आगामी चित्रपटात आपण एका समलिंगी(गे) प्राध्यापकाची भूमिका साकारणार असल्याचे अभिनेता मनोज वाजपेयी याने स्पष्ट केले आहे. आपल्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण जानेवारी महिन्यापासून सुरू होणार असून त्याची तयारी सुरू केली असल्याचे मनोज वाजपेयीने सांगितले. विशेष म्हणजे, या चित्रपटात एका ६० वर्षीय समलिंगी प्राध्यापकाची भूमिका साकारणार असल्याचे त्याने सांगितले.
‘शाहिद’साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार आणि लागोपाठ ‘सिटीलाइट’सारखा वेगळा चित्रपट देणारे हंसल मेहता यांचे चित्रपट दखल घेण्यास पात्र ठरत आले आहेत. त्यामुळे या चित्रपटातही काहीतरी वेगळे देण्याचा मेहता यांचा कयास आहे. निवृत्त होण्याच्या वाटेवर असलेला अलिगढ विद्यापीठातील एक प्राध्यपक ऑटो रिक्षा चालकासोबत सेक्स करताना गुप्त कॅमेरामध्ये कैद होतो आणि प्राध्यपक समलिंगी असल्याचे पितळ उघडे पडते. त्यानंतर या प्राध्यापकाला सामोरे जावे लागणाऱया विविध प्रसंगछटा या कथानकावर हा चित्रपट आधारलेला असणार आहे.