बेळगावी मराठी संगीत नाटय़सृष्टीचा शतकोत्तर प्रवासाचा योग
मराठी माणसांच्या ‘मर्मबंधातील ठेव’ असलेल्या संगीत नाटकाच्या सुरेल प्रवासाच्या लडी शनिवारी कर्नाटकातील बेळगावातील रसिकांसमोर उलगडणार आहेत. १४० वर्षांपूर्वी बेळगावातील सरस्वती वाचनालयाच्या खुल्या जागेत पहिला प्रयोग करून मराठी रंगभूमीवर अवतरलेल्या आणि मराठी संगीत नाटय़विश्वातील मानाचे पान ठरलेल्या अण्णासाहेब किर्लोस्करांच्या ‘संगीत शाकुंतल’पासून अलीकडच्या ‘कटय़ार काळजात घुसली’पर्यंतच्या संगीत नाटकाच्या समृद्ध परंपरेचा ‘अमृतानुभव’ शनिवारी बेळगावकरांना मिळणार आहे.
बेळगावातील सरस्वती वाचनालयाच्या वास्तूत १४० वर्षांपूर्वी, ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी ‘संगीत शाकुंतल’चा पहिला प्रयोग झाला होता. बेळगावकर रसिकांनी त्या प्रयोगास तुडुंब गर्दीही केली होती. अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या या चार अंकी नाटकाच्या त्या प्रयोगास शनिवारी, ३१ ऑक्टोबर रोजी १४० वर्षे पूर्ण होत असून त्या निमित्ताने पुन्हा तो काळ जिवंत करण्याचा ध्यास सरस्वतीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला, आणि त्याच ढंगात त्याचे आयोजनही केले आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार असल्याचे वाचनालयाचे अध्यक्ष पंढरीनाथ कुलकर्णी यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटाचे दिग्दर्शक सुबोध भावे आणि त्यांचे सहकारी कार्यक्रमात सहभागी होणार असून १४० वर्षांपूर्वीचे वातावरण आणि काळ आम्ही पुन्हा उभा करणार आहोत. तेव्हा नाटकाचा प्रयोग वाचनालयाच्या खुल्या जागेत झाला होता. प्रेक्षकांनी पारंपरिक वेशात म्हणजे पुरुषांनी धोतर, कोट आणि महिलांनी नऊवारी साडी नेसून यावे, असे आवाहन आम्ही रसिकांना केले आहे. या कार्यक्रमातून नाटय़संगीताचा इतिहास, आठवणी उलगडल्या जाणार असून अनेक नाटय़पदे सादर केली जाणार आहेत. अभिनेते दिग्दर्शक सुबोध भावे, पं. जितेंद्र अभिषेकी, गायक महेश काळे, अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आदी सहभागी होणार असल्याचेही कुलकर्णी म्हणाले.

‘हे तर आमचे भाग्य!’
‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी आम्ही हा कार्यक्रम करत आहोत. ‘संगीत शाकुंतल’च्या चार अंकी नाटकाचा पहिला प्रयोग येथेच झाला आणि पुढे पाच वर्षांनी म्हणजे १८८० मध्ये आणखी एका अंकाची भर घालून अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी याच ठिकाणी पाच अंकी ‘संगीत शाकुंतल’ सादर केले होते. मराठी संगीत रंगभूमीचा पाया घातला गेला त्याच ठिकाणी आम्हाला हा कार्यक्रम करण्याची संधी मिळाली, ही आमच्यासाठी सगळ्यात जास्त आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.
– सुबोध भावे (अभिनेता व दिग्दर्शक)