टीव्ही हळूहळू मोठा होतोय, ही हाक गेल्या काही काळापासून सतत कानावर येत आहे. सध्याचे टीव्हीचे स्वरूप पाहता त्यातील सत्यता काही अंशी पटू शकते; पण त्याचसोबत दिवसागणिक मोठय़ा होणाऱ्या या टीव्हीच्या विश्वाची कमान सध्याच्या तरुण चेहऱ्यांवर असल्याचे चित्रही समोर येत आहे. मॉडेलिंग, सौंदर्य स्पर्धा, नाटक, जाहिराती या क्षेत्रांतून पुढे आलेल्या या चेहऱ्यांनी आता दैनंदिन मालिकांपासून ते फिक्शन शोजपर्यंत प्रत्येक गोष्टीची सूत्रे आपल्या हातात घेतली आहे. अगदी स्टार प्लस, सोनी टीव्ही, झी टीव्हीसारख्या प्रस्थापित वाहिन्या असोत किंवा जिंदगी, सोनी पलसारख्या नव्याने आलेल्या वाहिन्या असू देत, सर्वत्र तरुणाईची पताका यशस्वीरीत्या फडकत आहे. टीव्हीवरील या नवीन फळीतील काही जणांशी बोलून त्यांचे अनुभव जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न.
अश्विनी कासार (कमला कमला- ई टीव्ही)
विजय तेंडुलकरांचे गाजलेले नाटक ‘कमला’ मालिकेच्या स्वरूपामध्ये टीव्हीवर आणण्याचा घाट ई टीव्ही वाहिनी करत आहे. या मालिकेतील कमलाची मध्यवर्ती भूमिका साकारणारी अश्विनी कासार ही या नवीन फळीचीच एक शिलेदार आहे. या भूमिकेबद्दल बोलताना बदलापूरची अश्विनी सांगते, ‘‘मी कॉलेजमध्ये शिकत असताना नाटकांची आणि अभिनयाची केवळ आवड म्हणून कॉलेजच्या नाटकांमध्ये भाग घेतला. त्यातूनच एकदा ‘कमला’साठी ऑडिशन्स सुरू असल्याचे कळले आणि मीसुद्धा ऑडिशन द्यायला गेले आणि पाच लूक टेस्टनंतर माझी निवड झाली. त्यानंतर खऱ्या अर्थाने मी कमलाला जगायला सुरुवात केली.’’  ‘‘मला कमलाचे पात्र खूप नैसर्गिक आणि निरागस वाटतं. तिच्यामध्ये सतत नवीन जाणून घ्यायची ऊर्मी आहे. ती हुशार आहे, पण शहरी वातावरणामधला कावेबाजपणा तिच्यात नाही.’’ तेंडुलकरांचे हे नाटक आणि त्यातील विषयाचे गांभीर्य तिला पुरेपूर ठाऊक आहे, त्यामुळे ही भूमिका वठवताना दडपण येणे हे साहजिकच आहे आहे, असे ती सांगते; पण या दडपणाचा बाऊ न करता त्याचा सामना करण्याची तयारीही तिच्यामध्ये आहे. ‘‘तेंडुलकरांच्या नाटकांना वेळेचे आणि काळाचे बंधन नव्हते. ‘कमला’मध्ये मांडलेला विषय आजही तितकाच नवा आहे. त्यामुळे ही भूमिका स्वीकारताना मनामध्ये थोडी हुरहुर होती; पण आता प्रवाहात उतरलेय तर पोहावे तर नक्कीच लागणार हा निर्धार करूनच ही भूमिका मी स्वीकारली.
शिव्या पठानियाँ (आरझू हमसफर – सोनी टीव्ही)
शिमलामध्ये असताना मॉडेलिंगची इच्छा आहे म्हणून शिव्याने ‘मिस शिमला २०१३’ स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि ती जिंकूनही आली. त्यानंतर लगेचच पुढे काय? हा विचार करायची उसंतसुद्धा तिला मिळाली नाही. स्पर्धेदरम्यान तिला एका मालिकेसाठी मुंबईमध्ये ऑडिशन्स होत असल्याचे कळले आणि ती थेट मुंबईला रवाना झाली. ‘‘मुंबईला येताना माझ्या मनामध्ये दोन दिवस मुंबईला येईन, समुद्र बघेन, ऑडिशन देईन आणि परत घरी जाईन असे होते. त्यामुळे केवळ दोन दिवस पुरतील इतकेच कपडे घेऊन मी येथे दाखल झाली होती. एक तर मुंबई येथील चित्रनगरी माझ्यासाठी पूर्णपणे नवीन होती. त्यात अभिनय क्षेत्रामध्ये काम करायचेच आहे असेही काही माझ्या मनात पक्के नव्हते. त्यामुळे या ऑडिशनकडून माझ्या फारशा अपेक्षासुद्धा नव्हत्या; पण पहिल्याच ऑडिशनमध्ये माझी निवड झाली आणि मला ही मालिका मिळाली. ‘‘लखनऊमध्ये फॅशन डिझायनर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आरझूला एका फॅशन शोच्या माध्यमातून मुंबईच्या मोठय़ा फॅशन हाऊसमध्ये काम करायची संधी मिळते आणि ती मुंबईमध्ये दाखल होते. त्यानंतर तिच्या पूर्ण आयुष्याला कलाटणी मिळायला सुरुवात होते.’’ शिव्या या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदा कॅमेऱ्याला सामोरी जाणार होतीच, पण त्यासोबतच हा शो टीव्हीवरील एके काळचा लाडका चेहरा हर्षद चोप्राचा कमबॅक शो होता. त्यामुळे त्याच्यासमोर स्वत:ला सिद्ध करायची जबाबदारीही तिच्या खांद्यावर होती. ‘‘हर्षदसोबत काम करायचे हे माझ्यासाठी आव्हान होते, कारण मी स्वत: त्याच्या मालिका पाहिल्या होत्या आणि तो टीव्हीमधील माझा लाडका नट होता; पण त्याने स्वत:हून या दडपणाची जाणीव मला कधीच करून दिली नाही.’’
रोहन गंडोत्रा, क्षमता अंचल आणि साहिल सलाठी
(एव्हरेस्ट – स्टार प्लस)
आशुतोष गोवारीकरचे नाव समोर येताच एखादा भव्य विषय आणि त्यापेक्षाही भव्य आखणी डोळ्यासमोर येते. त्यांनी टीव्हीवर पुनरागमन करण्याचे ठरवले तेही ‘एव्हरेस्ट’सारख्या एका मोठय़ा विषयाला हात घालत. या मालिकेच्या निमित्ताने कित्येक गोष्टी टीव्ही क्षेत्रामध्ये पहिल्यांदा होत असतील तरी, सर्वात महत्त्वाचे म्हणजे या मालिकेसाठीसुद्धा त्यांनी नवोदित कलाकारांवर विश्वास टाकायचा ठरवला आहे. रोहन गंडोत्रा, क्षमता अंचल आणि साहिल सलाठी ही पूर्णपणे नवीन कलाकार मंडळी या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना भेटायला येणार आहेत. मालिकेत अंजली सिंग रावतची मुख्य भूमिका साकारणाऱ्या क्षमताला मॉडेलिंगमध्ये कारकीर्द करायची होती; पण एका जाहिरातीमध्ये तिला पाहून या मालिकेसाठी तिला विचारणा झाली आणि मालिकेमध्ये तिचा प्रवेश निश्चित झाला. साहिल आणि रोहनची गोष्टसुद्धा थोडय़ाअधिक फरकाने तशीच आहे; पण असे असले तरी पहिल्या मालिकेत दिग्गज तंत्रज्ञ, कलाकार यांच्यासोबत काम करायचे आणि त्यावर विविध वर्कशॉपच्या माध्यमांतून प्रत्येक अडचणीसाठी स्वत:ला सिद्ध करायचे हे त्यांच्यासाठी सोपे नव्हते. ‘‘या मालिकेनिमित्त आम्हाला एव्हरेस्टवर चढायचे होते, त्यामुळे गिर्यारोहणापासून ते त्या थंड वातावरणामध्येसुद्धा आपले उच्चार कसे पक्के ठेवायचे या सर्व गोष्टींचे प्रशिक्षण आम्हाला देण्यात आले,’’ असे रोहन सांगतो. ‘‘मालिकेमध्ये अनुभवी तंत्रज्ञ, कलाकार असण्याची भीती वाटण्यापेक्षा आम्हाला त्याचा खूप फायदा झाला.
नवी भंगू, अपर्णा दीक्षित आणि मनराज सिंग
(ये दिल सून रहा है – सोनी पल)
    एकता कपूरची मालिका म्हणजे यशाची आणि उत्तम कारकिर्दीची पूर्ण खात्री हे टीव्ही क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला ठाऊक असते. त्यामुळे येथे काम करायला येणारा प्रत्येक जण ‘एकदा तरी एकता कपूरच्या मालिकेमध्ये काम करायला मिळावे’ ही इच्छा मनामध्ये घेऊन येतो. ही संधी कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये नवी, अपर्णा आणि मनराज यांना मिळाली. यांच्यापैकी नवी आणि अपर्णाने याआधी पडद्यावर छोटय़ा भूमिका साकारल्या असल्या तरी ही मालिका त्यांच्यासाठी एक मैलाचा दगड ठरली आहे. ‘‘मी सुरुवातीपासून एकता कपूरच्या मालिकेमध्ये काम करायला मिळावे, अशी इच्छा धरूनच या क्षेत्रामध्ये आलो. सुरुवातीला एक-दोन छोटय़ामोठय़ा भूमिका केल्या आणि बालाजीमधून या भूमिकेसाठी विचारणा झाली. त्या वेळी नाही म्हणण्याचे काही कारण नव्हतेच,’’ असे नवी सांगतो. तो या मालिकेमध्ये एका बिहारी मुलाची भूमिका साकारत आहे. ‘‘एका बिघडे बाप की औलाद अशी काहीशी माझी भूमिका आहे. त्याच्या आयुष्यात एका संयमी आणि गुणी मुलीचा प्रवेश होतो आणि त्याचे संपूर्ण आयुष्य बदलून जाते.’’ मालिकेत काम करणारे आम्ही सर्वच जण नवीन असल्याने एकमेकांना समजून घेणे सोपे जाते, असे तो सांगतो.
आकर्षण सिंग (महारक्षक आर्यन – झी टीव्ही)
कॉलेजमध्ये शिकणारा आकर्षणने सहज म्हणून एका शोसाठी ऑडिशन दिली आणि त्याच्या पहिल्याच मालिकेमध्ये त्याला एका सुपरहिरोची भूमिका साकारायला मिळाली. ‘‘प्रत्येक मुलाचे स्वप्न असते की, आपण एक दिवस सुपरहिरो बनावे आणि आज मी हे स्वप्न जगतो आहे.’’ स्पायडरमॅन हा अक्षतचा लाडका सुपरहिरो आणि या शोमध्ये तो साकारत असलेल्या सुपरहिरोला स्पायडरमॅनची छटा असल्याने तो भलताच खुशीत आहे. ‘‘मला लहानपणापासून स्पायडरमॅन त्याच्या निरागसतेसाठी आवडत होता. तो कॉलेजमध्ये जाणारा साधा, सरळ मुलगा आहे. त्याचे जिच्यावर प्रेम आहे तिच्यासाठी काहीही करण्यास तो तयार होतो. हे सर्व गुण मी साकारत असलेल्या सुपरहिरोमध्ये आहेत,’’ असे तो सांगतो.