भारतीय फलंदाजीच्या मधल्या फळीचा तडाखेबाज खेळाडू युवराज सिंग याने सोमवारी निवृत्ती जाहीर केली. युवराजने त्याच्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. या निर्णयानंतर त्याची पत्नी हेजल किच हिने एक खास पोस्ट लिहिली. हेजलच्या या पोस्टवर युवराजची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री किम शर्मालाही कमेंट करण्याच मोह आवरला नाही.

‘..आणि या (निवृती)बरोबरच एका पर्वाचा अंत झाला. स्वत:बद्दल अभिमान बाळग आणि आता नव्या अध्यायाला सुरुवात करूया.. लव्ह यू,’ अशा शब्दांत हेजलने त्याला पाठिंबा दर्शवला. यावर युवराजची एक्स गर्लफ्रेंड किम शर्मा हिनेही कमेंट केली. ‘तुमची जोडी अशीच चमकत राहू दे,’ अशी कमेंट किमने केली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल १८ वर्ष आपला ठसा उमटवल्यानंतर अखेर युवराने सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. पण देशांतर्गत टी-२० क्रिकेटमध्ये मात्र युवराज सिंग अजूनही खेळणार असल्याचे त्याने स्पष्ट केले. युवराजने पत्रकार परिषदेत त्याच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. निवृत्तीचा निर्णय घेताना युवराज अत्यंत भावूक झाल्याचे दिसून आले. निवृत्तीचा निर्णय घेणे हे माझ्यासाठी अत्यंत कठीण होते, पण मी माझ्या कुटुंबियांशी चर्चा करून तसेच इतर वरिष्ठ आजी-माजी क्रिकेट सहकारी यांच्याशी चर्चा करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला, असे युवराजने मुंबईतील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.