क्रिकेटर झहीर खानने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगेशी विवाह केला. दोघांनी अनेक वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर झहीरने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सागरिकाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सागरिका त्याचे कपडे नीट लावताना दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना झहीरने लिहिले की, ‘बायको माझ्या आयुष्याची घडी नीट बसवतेय.’

या फोटोत सागरिका फार त्रासलेली दिसते. झहीरच्या कपड्यांचा डोंगर पाहून हे सगळं कसं आवरायचं हाच विचारजणू ती करत असेल. वातावरण थोडं हलकं करावं म्हणून या फोटोमध्ये युवराज सिंगने कमेंट करत म्हटले की, आता तर खरी मजा सुरू झाली आहे. युवराजची ही कमेंट इतरांना आवडली असली तरी सागरिकाने अजूनपर्यंत त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. झहीरच्या चाहत्यांनी तो फार नशीबवान असल्याचेही म्हटले आहे. तर काहींनी कमेंटमध्ये हे लग्नाचे दुष्परिणाम असल्याचे म्हटले.

अतिशय शांत स्वभाव असलेला झहीर आणि त्याच्या अगदी उलट असलेली सागरिका यांची प्रेमकहाणीसुद्धा रंजक आहे. सागरिका आणि झहीरची ओळख अंगद बेदी आणि इतर काही मित्रांमुळे झाली. त्यानंतर दोघांनी जवळपास दीड वर्ष एकमेकांना डेट केले. मात्र, या दोघांनीही कोणालाच त्यांच्या प्रेमप्रकरणाचा पत्ता लागू दिला नाही. काही वेबसाइट्सच्या वृत्तानुसार, पहिल्या भेटीत हे दोघंही एकमेकांना पसंत करू लागले होते. दोघांच्या नंतर भेटीगाठी वाढल्या आणि अनेक कार्यक्रमांमध्येही ते एकत्र दिसू लागले. इतकेच नव्हे तर आयपीएल सामन्यांवेळीही सागरिका तिच्या झॅकला पाठिंबा देताना दिसली.