अभिनेत्री झायरा वसीमने टोळधाडीवर मांडलेलं तिचं मत चर्चेचा विषय ठरला आहे. यामुळे ती सोशल मीडियावर चांगलीच ट्रोलदेखील झाली. टोळधाड म्हणजे अल्लाहचा प्रकोप असल्याचं मत तिने ट्विटरवर मांडलं होतं. या प्रकरणानंतर तिने ट्विटर अकाऊंट डिलिट केलं होतं. ते पुन्हा सुरू करत झायराने स्पष्टीकरण दिलं आहे. एक ट्विटरवर एक भलीमोठी पोस्टच लिहिली आहे.

लेखक तारिक फतेह यांच्या ट्विटला उत्तर देत झायराने संपूर्ण प्रकरणावर मौन सोडलं आहे. ‘भारतीय मुस्लीम अभिनेत्री झायरा वसीमने टोळधाड म्हणजे अल्लाहचा प्रकोप म्हणत आपल्याच देशातील लोकांची खिल्ली उडवली आहे’, असं ट्विट तारिक फतेह यांनी केलं होतं. यावर झायराने लिहिलं, ‘देशाच्या काही भागात झालेली टोळधाड हा अल्लाहचा प्रकोप असल्याचा दावा मी केला नाही. किंबहुना कोणत्याही घटनेला अल्लाहचा प्रकोप म्हणणं धार्मिक दृष्टीकोनातून बेजबाबदार वक्तव्य आहे. माझ्या ट्विटचा अर्थ चुकीचा काढला गेला. मला त्याबाबत कोणलाही स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. मी फक्त अल्लाहला उत्तर देण्यास बांधिल आहे. सध्या संपूर्ण जग कठीण काळातून जात आहे. त्यात तिरस्कार, द्वेष या गोष्टींची भर आपण घालू नये असं मला वाटतं.’ या पोस्टच्या शेवटी झायराने लिहिलं, ‘मी आता अभिनेत्री नाही.’

झायराने ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटानंतर अभिनय क्षेत्राला रामराम केला. ‘हे क्षेत्र मला माझ्या ईमानपासून दूर खेचत आहे. मी अल्लाहच्या रस्त्यापासून भरकटले होते,’ असं म्हणत तिने पाच वर्षांच्या करिअरला पूर्णविराम दिला. मात्र ट्विटरच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते.