कुस्ती हा महाराष्ट्रातील अस्सल मातीतला रांगडा खेळ. या खेळाला प्रोत्साहन मिळावं यासाठी झी टॉकीजवर ‘झी महाराष्ट्र कुस्ती लीग’चे आयोजन करण्यात आलं आहे. या लीगचा हा थरार पुण्याच्या बालेवाडीत रंगणार असून यावेळी एका खास व्यक्तीची उपस्थिती पाहता येणार आहे. २ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीमध्ये रंगणाऱ्या या खेळात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कुस्तीवीरांचा सहभाग असणार आहे. विशेष म्हणजे यावेळी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

नागराज मंजुळे हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असून ते केवळ दिग्दर्शक नसून लेखक, कवी आणि अभिनेतेही आहेत. आपल्या प्रत्येक कलाकृतीतून संवेदनशीलतेची जाणीव करून देणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे महाराष्ट्रातल्या खेळाबाबतही तितकेच सजग आहेत. ‘पिस्तुल्या’, ‘फँड्री’ व ‘सैराट’ यासारख्या चित्रपटातून आपले सामाजिक भान दाखवून देणारे नागराज मंजुळे आता झी टॉकीजसाठी ‘झी महाराष्ट्र कुस्ती लीग’चा प्रोमो दिग्दर्शित करणार आहेत.

दरम्यान, या दिग्दर्शनासोबतच ते अभिनय सुद्धा करणार आहेत. सैराटच्या अफाट यशानंतर नागराज मंजुळे यांच्याकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा कमालीच्या वाढल्या आहेत. त्यामुळे त्यांचे हे नवीन काम पाहण्याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे.