प्रेषित महंमद पैगंबर यांची व्यंगचित्रं दाखवून त्याविषयावर चर्चा घडविल्यामुळे पॅरिसमध्ये एका इतिहासाच्या शिक्षकाचा शिरच्छेद करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी १८ वर्षीय चेनेन या संशयित आरोपीस गोळ्या झाडून ठार केलं. शिक्षकांची हत्या केल्याच्या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त होत असून, अभिनेता जिशान अय्यूब याने देखील ट्विट करत या घटनेचा निषेध केला आहे.

“धर्मांधता आणि अज्ञानता कायमच सोबत असतात”, असं ट्विट जिशान अय्यूबने केलं आहे. त्याच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. अनेकांनी त्याच्या ट्विटवर कमेंट्स केल्या आहेत.


पॅरिसमध्ये एका १८ वर्षीय तरुणाने इतिहास शिक्षकाचा शिरच्छेद केला. हे इतिहास शिक्षक प्रेषित महंमद पैगंबर याचे व्यंगचित्र दाखवून त्यावर चर्चा घडवत होते. त्यामुळे या मुलाने हल्ला केला. त्यानंतर या हल्लेखोरावर पोलिसांनी घटनास्थळापासून ६०० मीटर अंतरावर गोळ्या झाडल्या.

दरम्यान, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी त्या शाळेस शुक्रवारी रात्री भेट दिली. त्यांनी या इस्लामी दहशतवादी हल्ल्याचा निषेध करून त्या विरोधात एकजुटीचे आवाहन केले.

दहा दिवस आधी धमक्या

संबंधित शिक्षकाने या व्यंगचित्रांवर चर्चा सुरू केल्यानंतर दहा दिवसांपूर्वी त्यांना धमक्या देण्यात आल्या होत्या. संशयित आरोपी मुलाच्या आईवडिलांनी शिक्षकाविरोधात तक्रारही दाखल केली होती.