सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर ही जोडगोळी आपण कित्येक हिंदी चित्रपटांमधून पाहिली आहे. मल्टिस्टारर चित्रपटांच्या लाटेत तर कधी हे दोघे नाही तर त्यांच्याबरोबर आणखी काही मोठे कलाकार अशी टीमच्या टीम चित्रपट गाजवताना आपण पाहिली आहे. ‘अमर अकबर अ‍ॅँथनी’, ‘अजूबा’ अशा अनेक प्रसिद्ध चित्रपटांमधून कधी मित्र, तर कधी भाऊ अशा नात्यांतून लोकांसमोर आलेली ही जोडगोळी कित्येक वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर एकत्र येते आहे तेही बापलेकाच्या भूमिकेत! ‘१०२ नॉट आऊट’ या चित्रपटात शंभरी पार केलेल्या वडिलांच्या भूमिकेत अमिताभ बच्चन आणि वय वर्ष सत्तर असलेल्या तरुणाच्या म्हणजेच त्यांच्या भूमिकेत ऋषी कपूर दिसणार आहेत. या चित्रपटासाठी दोन्ही सुपरस्टार कलाकारांना रोजचे सात तास हे फक्त मेकअपसाठी द्यावे लागत होते आणि चित्रीकरण पूर्ण होईपर्यंत या दोघांनीही कुरकुर न करता हे मेकअप सत्र पार पाडलं, असं सांगत दिग्दर्शक उमेश शुक्ला सुटकेचा श्वास सोडतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘१०२ नॉट आऊट’ हा चित्रपट सौम्या जोशी यांनी दिग्दर्शित केलेल्या गुजराती नाटकावर आधारित आहे. त्यामुळे या चित्रपटाची कथाही सौम्या जोशी यांनीच लिहिलेली आहे. मात्र या चित्रपटात ज्या दोन्ही प्रमुख व्यक्तिरेखा आहेत त्या अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांच्या प्रत्यक्ष वयापेक्षा मोठय़ा होत्या. त्यामुळे या दोघांनाही प्रॉस्थेटिक मेकअपशिवाय पर्याय नव्हता. मात्र या दोघांना दररोज सात तास हे फक्त मेकअपसाठी द्यावे लागत होते. ‘या दोघांनाही सकाळचे सात तास मेकअपसाठी आणि त्यानंतरचे सहा तास चित्रीकरणासाठी द्यावे लागत होते. सुरुवातीला ही मेकअपची फारच वेळखाऊ आणि किचकट प्रक्रिया त्यांच्यासाठी वैतागवाणी, त्रासदायक ठरेल असे मला वाटले होते. मात्र या प्रॉस्थेटिक मेकअपमुळेच त्यांना त्यांच्या व्यक्तिरेखेत शिरणे आणि त्या पद्धतीने अभिनय करणे शक्य झाले’, अशी माहिती उमेश शुक्ला यांनी दिली. अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर दोघेही पहाटे पाच वाजता बरोबर सेटवर असायचे. त्यानंतर त्यांचा मेकअप सुरू व्हायचा आणि मग जेवणानंतर आम्ही प्रत्यक्ष चित्रीकरणाला सुरुवात करायचो. साधारणपणे संध्याकाळी ६ वाजेपर्यंत चित्रीकरण चालायचं. कधीकधी मात्र अगदी रात्री नऊ वाजेपर्यंत सलग चित्रीकरण करावं लागायचं. सलग चित्रीकरणाचा भाग तेव्हाच यायचा जेव्हा आम्ही एखाद्या प्रसंगाच्या मध्यापर्यंत पोहोचलेलो असायचो. मग फक्त तो प्रसंग एकसलग चित्रित व्हावा यासाठी ते चित्रीकरण लांबायचं. लांबलचक मेकअप आणि लांबलचक चित्रीकरणाचा हा सिलसिला ४५ दिवस सुरू होता. शिवाय या ४५ दिवसांत नऊ रात्रीही चित्रीकरणात घालवल्या असल्याची माहिती दिग्दर्शक उमेश शुक्ला यांनी दिली. मात्र या दोघाही कलाकारांनी विनातक्रार हे चित्रीकरण पार पाडल्याबद्दल ते समाधान व्यक्त करतात.अमिताभ यांच्या मेकअपचा भाग त्यामानाने सहन करण्याजोगा होता. मात्र ऋषी कपूर यांच्या व्यक्तिरेखेला टक्कल आहे. त्यामुळे त्यांना ती कॅप चढवायला लागायची. बाकीचा मेकअप बाजूला ठेवला तरी फक्त ती कॅप घालून त्यांना बारा तास वावरायला लागायचं. त्यामुळे ती कॅप जेव्हा काढली जायची तेव्हा त्यांच्या डोक्यावर कोणी ग्लास-ग्लास भरून पाणी ओतलंय की काय अशी शंका यावी एवढे ते घामाने थबथबलेले असायचे, असे शुक्ला यांनी सांगितले. एवढय़ा कष्टांनी आणि प्रयत्नांनी उभी राहिलेली ही बापलेकाची अनोखी जोडगोळी मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात प्रेक्षकांना ‘१०२ नॉट आऊट’ या चित्रपटातून हसवायला येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 102 not out movie amitabh bachchan rishi kapoor
First published on: 01-04-2018 at 02:18 IST