लॉकडाउनमुळे सर्व प्रकारची वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली आहे. परिणामी तेलंगणमधील पेरूर गावाहून एक १२ वर्षांची मुलगी छत्तीसगडमधील आपल्या आदेड गावाकडे पायीच निघाली होती. दरम्यान रस्त्यात तिची प्रकृती बिघडली. मात्र तरीही तिने तीन दिवसांमध्ये १५० किमीचे अंतर कापले. परंतु गाव ११ किमीवर असताना तिचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेवर बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक शेखर कपुर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तिच्या मृत्यूला आपणच जबाबदार आहोत असं त्यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले शेखर कपुर?

या मुलीबाबत शेखर कपुर यांनी दु:ख व्यक्त केले. ते म्हणाले, “या लहान मुलीच्या मृत्यूला आपणच जबाबदार आहोत. आपल्याला सर्व श्रमिकांची परिस्थिती माहिती आहे. परंतु आपण डोळे बंद करुन ठेवले आहेत.” शेखर कपुर यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या दु:खद बातमीवर शोक व्यक्त केला आहे.

१५ एप्रिल रोजी या मुलीने प्रवास सुरु केला होता. तिच्यासोबत शेतात काम करणारे इतर ११ जण देखील होते. हे सर्वजण सलग तीन दिवस चालत होते. प्रवास करताना हायवे टाळण्यासाठी त्यांनी जंगलातूनही प्रवास केला. गावापासून १४ किमी लांब असताना जामलो हिच्या पोटात प्रचंड दुखू लागलं. यामुळे ती तिथेच खाली कोसळली. तिचा जागीच मृत्यू झाला. अखेर रुग्णवाहिकेच्या सहाय्याने तिचा मृतदेह घरी नेण्यात आला.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, डिहायड्रेशन आणि भुकेपोटी तिचा मृत्यू झाला आहे. “करोना चाचणी केली असता तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. तिच्या शरिरातील ऊर्जा कमी झाल्याने तसंच पाण्याची पातळी कमी झाल्याने त्रास सुरु झाला असावा,” असं वरिष्ठ जिल्हा वैद्यकीय अधिकारी बी आर पुजारी यांनी सांगितलं आहे.